भंडारा, दि. 30 : कोरोनाचा प्रादुर्भाव व आगामी दिवाळीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्ह्यात 30 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) लागू करण्यात आले आहे.
याअंतर्गत पुढीलप्रमाणे निर्बंध लावण्यात आले असून यात शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, लाठ्या किंवा काठ्या तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरण्यात येईल, अशी कोणतीही वस्तु सोबत ठेवणे. कोणताही दाहक पदार्थ व स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे, तयार करणे, व्यक्तिंचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा प्रतिमा त्यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे अशा विविध बाबींवर निर्बंध घालण्यात आले आहे. तसेच या अंतर्गत संपूर्ण भंडारा जिल्ह्यात पाच किंवा अधिक व्यक्ती रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी महेश पाटील यांच्या आदेशात नमुद आहे.