भंडारा, दि. 30 : स्टेट बँक इंडियामध्ये माजी सैनिक प्रवर्गातून राज्यात 7 हजार 425 सुरक्षा रक्षक भरती करावयाचे आहेत. त्यापैकी भंडारा जिल्ह्यात 180 माजी सैनिक प्रवर्गातून सुरक्षा रक्षक नियुक्त करावयाचे आहे. त्यानुसार सदर पदाकरीता इच्छुक सैन्य दलातील सेवानिवृत्त झालेल्या व पात्रता पूर्ण करीत असलेल्या जिल्ह्यातील माजी सैनिकांनी 3 नोव्हेंबर 2021 पर्यंत आपल्या डिस्चार्ज बुक, ओळखपत्र व रोजगार कार्डासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन नावे नोंदवावे.
सदर पदाकरीता माजी सैनिक 30 सप्टेंबर 1976 च्या अगोदरचा जन्म झालेला नसावा. शिक्षण कमीत कमी आठवा वर्ग पास, मात्र बारावी उत्तीर्ण नसावा. सैन्य दलातील सेवा कमीत कमी पंधरा वर्ष झालेली असावी. सैन्य दलातील हुद्या जास्तीत जास्त हवालदार किंवा त्यापेक्षा कमी असावा. सैन्य दलातील चारित्र्य चांगले असावे तसेच सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर उमेदवाराला कोणताही आजार, अपंगत्व नसावे, तो शारिरीक दृष्ट्या सक्षम असावा. तरी जास्तीत जास्त माजी सैनिकांनी नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, भंडारा यांनी केले आहे.