अन्न व्यवसाय करतांना परवाना किंवा नोंदणी बंधनकारक

अन्न व्यवसाय करतांना परवाना किंवा नोंदणी बंधनकारक

भंडारा, दि. 30 : सणासुदीच्या दिवसात मिठाई व फराळाचे पदार्थांना मोठ्या प्रमाणत मागणी असते. या कालावधीत बरेच व्यावसायिक मिठाई व फराळाचे पदार्थ उत्पादन व विक्रीचा व्यवसाय सुरू करतात. मात्र व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानदे कायाद्यातील तरतुदीनुसार सर्व अन्न व्यावसायिकांनी  परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी आवश्यक परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेऊनच सदर व्यवसाय करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे करण्यात आले आहे.
            परवाना व नोंदणी प्रमाणपत्रासाठी https://foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. अन्न व्यवसायाच्या स्वरूपानुसार आवश्यक कागदपत्रे तसेच शुल्क वरील संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे. याबाबत कोणतीही अडचण असल्यास helpdesk-foscos.fssai.gov.in या ई-मेल किंवा 1800112100 या टोल फ्री  क्रमांकावर संपर्क साधावा.
            अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदीनुसार सुट्या (लुज) स्वरूपात विक्रीसाठी प्रदर्शित केलेल्या मिठाई या अन्नपदार्थांच्या ट्रे किंवा कंटेनरवर बेस्ट बिफोर दिनांक टाकणे बंधनकारक असून व्यावसायिकांनी नोटीस बोर्डवर मिठाईचे स्वरूप (घटकपदार्थ) प्रदर्शित करणे आवश्यक आहे. अन्न विक्री व्यावसायिकांनी परवाना/ नोंदणी आस्थापनेच्या दर्शनी भागात प्रदर्शित करावा. मिठाई उत्पादनाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी व मिठाईकरीता लागणारा खवा व इतर पदार्थ परवाना/नोंदणी धारक आस्थापनाकडूनच खरेदी करावी. सदर तरतुदींचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर कायदेशीर कार्यवाही  केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त अ. प्र. देशपांडे यांनी कळविले आहे.