भंडारा, दि. 29:राज्यातील बहुतांशजिल्ह्यात झालेला सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे सोयाबीन बिजोत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहे. खरीप हंगाम-2022 करिता सोयाबीनच्या प्रमाणित बियाण्याची गरज लक्षात घेऊन कृषी विभागाचे निर्देशानुसार महाबिजव्दारे रब्बी/उन्हाळी 2021-22 हंगामात तुटीपुर्ती सोयाबीन जेएस-9305 वाणाचा बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
भंडारा जिल्ह्यातील विशेषत: भंडारा व पवनी तालुक्यातील शेतकरी बांधव सदर योजनेत सहभागी होऊ शकतात. उत्पादीत सोयाबीन जेएस-9305 वाणाचे बियाणेसाठी आकर्षक धोरण ठरविण्यात आले आहे. बिजोत्पादनाचे आयोजन करतांना एका गावात कमीत कमी 13 एकर क्षेत्राचे आयोजन होणे आवश्यक आहे. बियाणे महाबीजकडून पुरविण्यात येणार असून त्याकरीता आवश्यक शुल्क बियाणे उचल करतांना भरावयाचे आहे.
ज्या शेतकरी बांधवांना सोयाबीन बिजोत्पादन कार्यक्रम घ्यावयाचा आहे, त्यांनी महाबीज जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक एन. पी. खांडेकर यांनी केले आहे.