विद्यार्थ्यांनो ! आता कॉलेजमध्येच घ्या कोविड लस
मनपाच्या वतीने १८ वर्षांवरील युवक-युवतींसाठी विशेष मोहिम
चंद्रपूर, ता. २७ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार चंद्रपूर शहरात महानगरपालिकेच्या माध्यमातून युवा स्वास्थ्य मिशन लसीकरण मोहीमेंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. दोन नोव्हेंबरपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सामान्यांना कोविड लसीकरणासाठी फार त्रास सहन करावा लागला. कोरोना लाट पूर्ण भरात असताना मोठमोठ्या रांगेत तिष्ठत राहूनही लसीकरण म्हणावे तसे होत नव्हते. पण हळूहळू परिस्थिती निवळली आणि सुरुवातीला ६० वर्षे वयोमर्यादेवरील व्यक्तींपासून सुरुवात करून नंतर टप्प्याटप्प्याने ४५ वयोमर्यादेवरच्या व नंतर ४५ वर्षांखालील व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. आता महाविद्यालये उघडल्यानंतर तेथील विद्यार्थ्यांकरीता विशेष लसीकरण मोहीम सुरू होत असून, या सप्ताहात मनपाच्या आरोग्य विभागाचे पथक विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे लसीकरण करणार आहे. विद्यार्थ्यांनी या लसीकरण मोहिमेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी या लसीकरण मोहिमेत स्वयंप्ररणेने सहभागी होऊन लसीकरण करुन घ्यावे. पहिला डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनी दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.
-: महाविद्यालयाचे वेळापत्रक :-
1. सोमय्या पॉलिटेक्निक : 26 ऑक्टोबर
2. सोमय्या पॉलिटेक्निक : 27ऑक्टोबर
3. यशोधरा बजाज फार्मासिस्ट कॉलेज : 27 ऑक्टोबर
4. बजाज पॉलिटेक्निक : 27ऑक्टोबर
5. जनता महाविद्यालय : 28 ऑक्टोबर
6. जनता शिक्षण महाविद्यालय 28 ऑक्टोबर
7. जनता अध्यापक विद्यालय : 28 ऑक्टोबर
8. सरदार पटेल महाविद्यालय 28 ऑक्टोबर
9. साई पॉलिटेक्निक : 28 ऑक्टोबर
10. रेनेसान्स मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, दाताला रोड : 28 ऑक्टोबर
11. खत्री कॉलेज, तुकूम : 28 ऑक्टोबर
12. डॉ. आंबेडकर कॉलेज : 28 ऑक्टोबर
13. शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज : 29 ऑक्टोबर
14. एसपी लॉ कॉलेज तुकूम 30 ऑक्टोबर
15. शासकीय आयटीआय महाविद्यालय : 01 नोव्हेंबर