बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांचा घणाघात
मुंबई, १२ ऑक्टोबर
सत्ताधारी महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि विरोधातील भाजपच्या दुटप्पी भूमिकांमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.राज्यातील शेतकऱ्यांचे हाल दयनीय झाले आहेत. मुस्लिम बांधव असुरक्षित वातावरणात जगत आहेत. त्यांच्या सर्वांगिण विकासाकडे सर्वच पक्षांकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते. केवळ मतांसाठी त्यांचा सोयीस्कररित्या वापर करून घेतला जातो, असा थेट आरोप बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी केला. मंगळवारी संवाद यात्रे निमित्त मालेगावात आयोजित सभेतून त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.
‘बीएसपी के तीन कप्तान,दलित,ओबीसी,मुसलमान’ ही घोषणा मालेगावासह राज्यातील सर्वसामान्यान, शोषित, पीडित, उपेक्षित सार्थकी ठरवतील. दलित, आदिवासी, ओबीसी प्रमाणे मुस्लिम बांधवांचे हित देखील बसपातच सुरक्षित आहे. मुस्लिमांना योग्य सन्मान देण्याचे काम केवळ बसपाच करू शकते. अशात मा.बहन मायावती जी यांच्या नेतृत्वात बसपाच्या निळ्या झेंड्याखाली एकत्रित येण्याचे आवाहन, यावेळी अँड.ताजने यांनी केले.
मालेगावात मुस्लिम बांधवांचे प्राबल्य आहे. मान्यवर कांशीराम यांचे विचार आणि मा.बहनजींच्या नेतृत्वात बसपाच्या झेंड्याखाली सर्वसमावेशक विकासासाठी मुस्लिम बांधवांच्या मदतीची आवश्यकता आहे.’सर्वजन हिताय,सर्वजन सुखाय’चे उद्दिष्टापर्यंत पोहचून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ यशस्वी करण्यासाठी मुस्लिम बांधवांची त्यांची मोलाची साथ बसपाला द्यावी,असे आवाहन त्यांनी यानिमित्ताने केले. आजच्या सभेतून मुस्लिम बांधवांनी त्यांचा बसपावर आणि बहेनजींवर असलेला अतुट विश्वास पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. आगामी निवडणुकांमध्ये बसपाच्या या ‘कप्तानां’च्या बळावरच बसपाचा निळा झेंडा उंच फडकेल,असा विश्वास अँड.ताजने यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात प्रदेश महासचिव इंजि.शांताराम तायडे, प्रदेश सचिव आनंद आढाव, रमेश निकम,जिल्हा प्रभारी पोलस अहिरे, रिफक सिद्धीकी, जिल्हा अध्यक्ष संतोष शिंदे, लालचंद शिरसाठ,शहर अध्यक्ष सुनील पवार, उपाध्यक्ष दिलीप पाथरे, महासचिव राजू जाधव, संघटक दिलीप गवळी, बीव्हीएफचे सुमित पवार, विद्यार्थी संघटना अध्यक्ष रोहित तेली, चर्मकार भाईचार कमिटी अध्यक्ष नंदू डावरे,आदिवासी भाईचारा कमिटी अध्यक्ष योगेश सोनोने,वाल्मिकी समाज कमिटी चंदन ढिलार, चर्मकार भाईचारा कमिटीचे अश्विनी अहिरे तसेच इतर कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
कॉंग्रेस पक्ष दलित विरोधी-प्रमोद रैना
कॉंग्रेसशासित राजस्थानमध्ये दलिताला मारहाण करीत त्यांची निघृण हत्या करण्यात आली. देशभरात या घटनेची चर्चा,निंदा करण्यात आली.पंरतु,कॉंग्रेस नेतृत्वाने या प्रकरणी मौन बाळगत पक्षातील इतर दलित नेत्यांवरही यासंबंधी बोलण्यास बंदी घातली आहे. ही बाब अत्यंत दु:खद,लज्जास्पद आहे. कॉंग्रेस पक्षात आणि कॉंग्रेसच्या सरकारमध्ये दलितांना पुर्वीही कुठले महत्व नव्हते आणि आताही नाही.कॉंग्रेसला दलितांच्या सुरक्षेची काळजीच नाही.पंजाबचे नवीन मुख्यमंत्री व गुजरात कॉंग्रेसच्या नवीन नेत्यांनी याप्रकरणी दुटप्पी भूमिका घेत मौन बाळगणे कितपत योग्य आहे? असा सवाल बसपाचे प्रदेश प्रभारी मा.प्रमोद रैना यांनी उपस्थित केला. कॉंग्रेस तसेच इतर पक्षाच्या दुटप्पी भूमिकेपासून सर्वसामान्यांनी सावध राहण्याचा इशारा यानिमित्ताने त्यांनी दिला.