मिशन कवच कुंडल’ अभियान राबवू या… कोरोनाची तिसरी लाट थोपवू या…
जिल्ह्यात कोविड लसीकरणाची प्रभावी अंमलबजावणी
‘कोरोनाची नाही भिती, कवच कुंडल लावले हाती’
भंडारा,दि.11: जिल्ह्यात 8 ते 14 आक्टोबर 2021 पर्यंत 6 दिवस विशेष कोविड-19 लसीकरण मोहीम ‘मिशन कवच कुंडल’ या नावाने सुरु करण्यात करण्यात आली असून या कालावधीत कोविड-19 लसीकरण ‘मिशन कवच कुंडल’ मोहिमेत प्रथम डोस शिल्लक असलेल्या लाभार्थ्यांचे जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर देण्यात येत असून पहिला डोस न झालेले लाभार्थी तसेच पहिला डोस झालेल्या, दुसऱ्या डोस करीता पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे.
जिल्ह्यात 8 आक्टोबर 2021 पर्यंत एकुण 11 लाख 39 हजार 342 लसीकरण झाले असून ‘मिशन कवच कुंडल’ मोहिमेत 10 आक्टोंबर 2021 पर्यंत पहिला डोस 9 हजार 404 तर दुसरा डोस 15 हजार 137 लाभार्थ्यांनी घेतला आहे. कोव्हॅक्सिन 17 हजार 504 व कोविशिल्ड 7 हजार 37 असे एकुण 24 हजार 541 लसीकरण करण्यात आले.
मिशन कवच कुंडल मोहिमे अंतर्गत तालुकानिहाय, गावनिहाय व लसीकरण बुथनिहाय पहिला डोस व दुसरा डोस शिल्लक असलेल्यांची बुथ निहाय लसीकरणाची माहिती सर्व संबधीत कर्मचाऱ्यांना देवून संबधीत कर्मचारी त्या व्यक्तीशी संपर्क करुन त्यांना लसीकरण करुन घेण्यास मतपरिवर्तन करीत आहेत. जास्त लाभार्थी शिल्लक असलेल्या बुथवर दोन पाळीत रात्री 10 वाजेपर्यंत लसीकरण करण्याची सोय उपलब्ध करुन देण्याकरीता अतिरिक्त मनुष्यबळाची व्यवस्था आरोग्य प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
‘मिशन कवच कुंडल’ अभियान राबवू या… कोरोनाची तिसरी लाट थोपवू या… अंतर्गत जिल्ह्यात कोविड लसीकरणाची पहिला डोस न झालेल्या लाभार्थी तसेच पहिला डोस झालेल्या, दुसऱ्या डोस करीता पात्र लाभार्थीची आशा स्वयंसेविकांमार्फत गावातील 18 वर्षावरील लाभार्थीची यादी तयार करुन सुटलेल्या लाभार्थ्यांना लसीकरण करुन घेण्यास मतपरिवर्तन करुन व कोविड-19 लसीकरणापासून होणारे फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
सदर ‘मिशन कवच कुंडल’ मोहिमेत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, खंड विकास अधिकारी, शिक्षण विभाग, महसूल विभाग, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, सरपंच या शासकीय यंत्रणेसह जिल्ह्यातील महिला बचत गट, महिला/युवक मंडळ, सामाजिक तसेच राजकीय संस्थांचा सहभाग घेण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, भंडारा डॉ. प्रशांत उईके यांनी दिली.