गरोदर माता व प्रसूती पश्चात महिलांनी कोविड लस घ्यावी – जिल्हाधिकारी संदीप कदम
लसीकरण सुरक्षित
भंडारा,दि.7:- गरोदर माता व प्रसूती पश्चात मातेमध्ये लसीकरणाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. प्रसूती पूर्व व प्रसूती पश्चात काळात कोविड-19 लसीकरण करणे हे सुरक्षित आहे व कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही. मातेला झालेल्या लसीकरणामूळे बाळाचे सुध्दा संरक्षण होते. करीता सर्व गरोदर मातांनी लसीकरण करून घ्यावे. या करीता जवळच्या सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.
जिल्ह्यातील एकुण लसीकरण: 6 ऑक्टोबर 2021 पर्यंत 11 लाख 11 हजार 145 लसीकरण झाले आहे. त्यात पहिला डोस 7 लाख 82 हजार 265 आणि दुसरा डोस 3 लाख 28 हजार 880 नागरिकांनी घेतला आहे.
लसीकरणाचे फायदे :- एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला आजार होण्यापासून प्रतिबंध करता येते. रोगाची तीव्रता कमी होते. प्रतिकार शक्ती निर्माण होते. मृत्यु दर कमी होते.
गर्भवती-प्रसूतीपश्चात महिलांचे लसीकरण: केंद्र व राज्य शासनाच्या वतीने गर्भवती महिलांकरीता कोविड-19 लसीकरणाची शिफारस करण्यात आली असून राज्यात 16 जुलै 2021 पासून गर्भवती महिलांच्या कोविड-19 लसीकरणास सुरवात करण्यात आली आहे.बहुतांश वेळा गर्भवती महिलांमध्ये लक्षणे दिसून येत नाही किंवा सौम्य स्वरुपाची लक्षणे दिसून येतात. परंतु त्यांची प्रकृती वेगाने खालावू शकते आणि त्याचाविपरित परिणाम गर्भावर देखीत होऊ शकतो. कोविड-19 संसर्ग होऊ नये याकरीता गर्भवती महिलांनी सर्व प्रकारची खबरदारी घेणे महत्वाचे आहे. यामध्ये कोविड-19 लसीकरणाचा देखील समावेश आहे. त्यामुळे गर्भवती महिलांनीकोविड-19 लस घ्यावी अशी शिफारस करण्यात आली आहे.
कोविड-19 मुळे गर्भवती महिलांच्या आरोग्यावर कशा प्रकारे परिणाम होतो याबाबत आरोग्य विभागाने महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. जरी कोविड-19 संसर्ग झालेल्या बहुतांश (90 टक्क्याहून अधिक) महिलांना रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता भासत नसली तरी काही महिलांची प्रकृती वेगाने खालावत जाण्याची शक्यता असते. लक्षणे दिसून येणाऱ्या गर्भवती महिलांमध्ये आजाराची तीव्रता वाढण्याचा आणि मृत्यू होण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो असे दिसून आले आहे. जर आजाराची तीव्रता वाढली तर इतर बाधीताप्रमाणे गर्भवती महिलांना देखील रुग्णालयात दाखल केले पाहिजे. उच्च रक्तदाब, स्थूलता, 35 वर्षापेक्षा अधिक वय यासारख्या वैद्यकीय अवस्था असलेल्या गर्भवती महिलांमध्ये कोविड-19 आजाराची तीव्रता वाढण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो. त्यामुळे लसीकरण गरजेचे आहे.
कोविड-19 मुळे संसर्गाचा परिणाम गर्भवती महिलांच्या बालकांवर कशाप्रकारे होतो: कोविड-19 संसर्ग झालेल्या मातांच्या बहुतांश (95 टक्क्यांहून अधिक) नवजात शिशुंची प्रकृती जन्माच्यावेळी अतिशय चांगल्या अवस्थेत असते. परंतु काही वेळा गर्भावस्थेदरम्यान झालेल्या कोविड-19 संसर्गामुळे अकाली प्रसूत होणे, शिशुचे वजन 2.5 किलोग्रॅमपेक्षा कमी असणे आणि क्वचित प्रसंगी शिशू जन्मापूर्वी मृत असणे या संभाव्यता वाढू शकतात.
गरोदर मातांच्या लसीकरणावर विशेष लक्ष: जिल्ह्यात गरोदर मातांच्या लसीकरणाला सुरुवात झाली असून आतापर्यंत 203 गरोदर मातांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रसुतीरोग तज्ञ यांचे मार्गदर्शनात गरोदर मातांचे लसीकरणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत असून गरोदरपणात गरोदर मातेच्या इच्छेनुसार कोविड-19 लसीकरण करण्यातयेत आहे. ग्रामीण व शहरी भागातील गरोदर मातांना लसीकरण करुन घेण्याबाबत आशा स्वयंसेविका व अंगणवाडी कार्यकर्ती यांचे मदतीने कोविड-19 लसीकरणानंतर त्यांचेवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येत असूनलसीकरणापासून होणारे फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. जास्तीत जास्त गरोदर मातांचे लसीकरण पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन लस घ्यावी. असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद डॉ. प्रशांत उईके यांनी केले आहे.