जिल्ह्यात विशेष कोविड-19 लसीकरण मोहीम ‘मिशन कवच कुंडल’
8 ते 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत
भंडारा,दि.7: राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आणि तालुका आरोग्य अधिकारी यांची 6 ऑक्टोबर 2021 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे आयोजित बैठकीतकोविड-19 च्या तीसऱ्या लाटेच्या संभावित धोका ओळखून राज्यात 8 ते 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत 6 दिवस विशेष कोविड-19 लसीकरण मोहीम ‘मिशन कवच कुंडल’ ह्या नावाने सुरु करण्यात येत असल्याचे सांगितले. त्याअनुषंगाने जिल्ह्यात विशेष कोविड- 19 लसीकरण मिशन कवच कुंडल राबविण्यात येणार आहे.
या कालावधीत कोविड-19 लसीकरण ‘मिशन कवच कुंडल’ मोहिमेत प्रथम डोस शिल्लक असलेल्या लाभार्थ्यांचे जास्तीत जास्त लसीकरण करावयाचे असल्याने पहिला डोस न झालेला लाभार्थी तसेच पहिला डोस झालेल्या, दुसऱ्या डोस करीता पात्र लाभार्थ्यांची आशा स्वयंसेविकांमार्फत गावातील 18 वर्षावरील लाभार्थींची यादी तयार करुन सुटलेल्या लाभार्थींना लसीकरण करुन घेण्यास मतपरिवर्तन करुन, कोविड-19 लसीकरणापासून होणारे फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कोविड-19 लसीकरण मोहीम ‘मिशन कवच कुंडल’ यशस्वीपणे राबविण्याकरीता जिल्ह्यास्तरावर 33 प्राथमिक आरोग्य केंद्र, 193 उपकेंद्रे तसेच जिल्हा रुग्णालय, 2 उपजिल्हा रुग्णालय व 7 ग्रामीण रुग्णालय सज्ज करण्यात आले आहेत. तसेच कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यात आला असून जिल्ह्यातील उपलब्ध मनुष्य बळाच्या माध्यमातून, जिल्हास्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक यांचे पर्यवेक्षणीय कार्याच्या सहाभागातून ‘मिशन कवच कुंडल’ मोहीम प्रभावीपणे यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.भंडारा यांनी केले आहे.