चंद्रपूर दि. 1 ऑक्टोबर : कोरोनाच्या प्रतिबंधात्मक आदेशास शिथिलता देण्यात आली असून सद्यस्थितीत जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकाने, आस्थापना सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना वर्तणूक विषयक नियमांचे पालन करून, तसेच अटी व शर्तीच्या अधीन राहून चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील आठवडी बाजार, जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यास्तव परवानगी देण्यात येत आहे. सदर आदेश संपूर्ण जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि. 1 ऑक्टोबर 2021 पासून लागु करण्यात येत आहे. असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहे.
नागरिकांनी फेस कव्हर, मास्कचा वापर करणे तसेच एकमेकांत सामाजिक अंतर राखणे बंधनकारक राहील. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास सक्त मनाई असेल. थुंकणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. विक्रेत्यांनी कोविड लसीकरणाचे दोन्ही डोज लवकरात लवकर पूर्ण करावेत. आठवडी बाजाराच्या ठिकाणी चाचण्या करण्याकरीता फिरते अॅंटीजेन चाचणी केंद्र उभारावे. केंद्र, राज्य शासन व कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या कोविड विषयक नियमांचे पालन होत आहे किंवा नाही यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची राहील.
सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अमलंबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय व कायदेशीर कार्यवाही
करण्यात येईल. सदर आदेश संपूर्ण जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि. 1 ऑक्टोबर 2021 पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील.