गांधी जयंती निमित्त विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन
Ø जवळच्या केंद्रावर जाऊन लस घेण्याचे आवाहन
चंद्रपूर दि. 1 ऑक्टोबर : कोरोना विरुद्धच्या लढाईत कोव्हीड प्रतिबंधक लस हे एक प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा लाभ घेता यावा यासाठी गांधी जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 15 लाखांच्यावर नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. विशेष मोहिमेदरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील 18 वर्षावरील सर्व वयोगटाकरीता 218 लसीकरण केंद्रावर कोविशिल्ड तर 7 लसीकरण केंद्रावर 18 वर्षावरील सर्व वयोगटासाठी कोवॅक्सिन लस देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 15 लक्ष 9 हजार 275 नागरिकांना लस देण्यात आली. त्यामध्ये पहिला डोस घेणारे 11 लक्ष 54 हजार 972 नागरिकांचा (70.34 टक्के) समावेश आहे. तर दुसरा डोस घेणाऱ्या 3 लक्ष 54 हजार 303 नागरिकांचा (21.57 टक्के) समावेश आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 85 हजार लसीचा साठा शिल्लक आहे. गांधी जयंतीनिमित्त विशेष लसीकरण मोहिमेमध्ये जवळपास 50 हजार नागरिकांना लस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यात मुबलक प्रमाणात लस उपलब्ध असून नागरिकांनी विशेष लसीकरण मोहिमेचा लाभ घेऊन सदर मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी केले आहे.