शेतकरी आत्महत्येची 13 प्रकरणे मदतीकरीता निकाली
Ø अपर जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा
चंद्रपूर,दि. 30 : शेतीमध्ये सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्जपरतफेडीचा तगादा या तीन प्रमुख कारणांपैकी शेतकरी आत्महत्या झाली असल्यास संबंधित कुटुंबाला 23 जानेवारी 2006 च्या शासन निर्णयाद्वारे आर्थिक मदत देण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणीची बैठक अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्येच्या 16 प्रकरणांवर चर्चा झाली. यापैकी 13 प्रकरणे पात्र करून मदतीकरीता निकाली काढण्यात आली तर 3 प्रकरणे समितीने अपात्र ठरविली.
‘ते’ आत्महत्याग्रस्त कुटुंब मदतीस पात्र : भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील शेतकरी आत्महत्या केलेले कुटुंब मदतीसाठी पात्र करण्यात आले आहे. सदरचा निर्णय जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. संबंधित शेतक-यावर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे 35 हजार रुपये कर्ज व त्यावरील 7385 रुपये व्याज असे एकूण 42385 रुपयांचे कर्ज होते.
बैठकीला अपर जिल्हाधिकारी यांच्यासह तहसीलदार यशवंत धाईत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अनिल वानखेडे, डॉ. मेश्राम, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.