अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात
शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना
चंद्रपूर दि. 30 सप्टेंबर : परदेशात उच्च शिक्षण घेण्याची संधी लाभलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे सोपे व्हावे, याकरीता परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. तरी अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुला-मुलींनी सदर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चिमूर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी के.ई.बावणकर यांनी केले आहे.
सदर शिष्यवृत्ती योजनेमध्ये 16 मार्च 2016 रोजीच्या शासन निर्णयान्वये योजनेअंतर्गत निकषांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. प्रस्तुत योजनेंतर्गत दरवर्षी कमाल 10 आदिवासी विद्यार्थ्यांची निवड करण्याची तरतूद आहे. व्यवस्थापन, वैद्यकीय अभियांत्रिकी, विज्ञान, कृषी इ. शाखांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरीता शिष्यवृत्ती देण्यात येते. पालकाचे वार्षिक उत्पन्न 6 लक्ष रुपयांच्या मर्यादेत असणे आवश्यक आहे. विद्यार्थी हा पूर्णवेळ नोकरी करीत नसावा.
कुटुंबातील फक्त एकाच अपत्यास सदर योजनेचा लाभ अनुज्ञेय आहे. तसेच विद्यार्थ्यांने परदेशात मान्यताप्राप्त विद्यापीठात प्रवेश घेतलेला असावा. अभ्यासक्रमाचे शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व विद्यापीठाने निर्धारित केलेली इतर शुल्क शिष्यवृत्ती स्वरूपात देण्यात येते. प्राप्त अर्जाची राज्यस्तरीय छाननी समितीद्वारा पडताळणी होऊन पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जाते व आयुक्तालय स्तरावर शिष्यवृत्तीचा लाभ मंजूर केला जातो.
तरी, इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी सदर शिष्यवृत्तीचा लाभ मिळविण्यासाठी कार्यालयामध्ये अर्ज सादर करावेत. असे प्रकल्प कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.