राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 6728 प्रकरणे निकाली

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 6728 प्रकरणे निकाली

भंडारा,दि.27:- न्यायालयीन प्रक्रिया म्हणजे गुंतागंतीची आणि वेळखाऊ तसेच पैसा खूप खर्च होतो असे आपण सातत्याने म्हणतो परंतू लोक न्यायालयाच्या माध्यमातून या टिकेला बाजूला करत 25 सप्टेंबर रोजी जिल्हा सत्र न्यायालय भंडारा व अधिनस्त तालुका न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकाच दिवशी 6 हजार 728 प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात 464 न्यायालयात प्रलंबित तर 6 हजार 264 न्याय पूर्वप्रविष्ठ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली.
जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंजू शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व फौजदारी व दिवाणी न्यायालय, कामगार न्यायालय, औद्यागिक न्यायालय, कौटुंबिक न्यायालय व तालुका न्यायालयात ही लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. पॅनल सदस्य म्हणून न्यायाधीश व अधिवक्तागण यांनी काम पाहीले. काही प्रकरणात पक्षकार हजर न राहता प्रकरणात तडजोड करण्याचा प्रयत्‍न यशस्वी करण्यात आला. लोक अदालतीमध्ये कोरोना काळात सर्व नियमांचे पालन करण्यात आले. सदर लोक अदालतीमध्ये 27 हजार 606 प्रकरणे ठेवण्यात आली होती. आजच्या लोक अदालतीच्या आयोजनात प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.एस.खूणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये कौटुंबिक वाद प्रकरणे निकाली काढण्यात आली. सदर प्रकरणे कौटुंबिक न्यायालय भंडारा येथे प्रलंबित होते. पॅनल अधिकारी दिवाणी न्यायाधीश एम.ए.कोठारी यांनी निर्णयक भूमिका बजावत संसार फुलविण्याची व मनोमिलनाची पक्षकाराला पुन्हा संधी देत यशस्वी केली.
लोक अदालतीच्या आयोजनासाठी केलेल्या सहकार्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुहास भोसले यांनी सर्व न्यायीक अधिकारी, पॅनल सदस्य, अधिवक्ता, कर्मचारी, पोलीस प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी व पक्षकारांचे आभार मानले.