भंडारा,दि.24:शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी डी. एल. एड. प्रथम वर्ष प्रवेशासाठी आतापर्यंत तीन फेऱ्या झाल्या आहेत. तरी शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने त्या विशेष फेरीद्वारे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येतील, असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य गुलाबराव राठोड यांनी कळविले आहे.
प्रवेशप्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक
प्रवेश प्रक्रियेची माहिती आणि सविस्तर नियमावली राज्य परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. डी.एल.एड. प्रवेशासाठी बारावीत विद्यार्थ्यांना खुल्या संवर्गासाठी किमान 49.5 टक्के, तर खुला संवर्ग वगळून इतर प्रवर्गासाठी 44.5 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याचा दिनांक 24 ते 28 सप्टेंबरपर्यंत आहे. पडताळणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्राची ऑनलाईन पडताळणी करण्याचा दिनांक 24 ते 30 सप्टेंबर या दरम्यान आहे. खुल्या प्रवर्गासाठी 200 रुपये, मागासवर्गीय सवंर्गसाठी 100 रुपये अर्ज शुल्क राहणार आहे. अधिक माहितीसाठी www.maa.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
यापूर्वी ज्यांनी अर्ज पूर्ण करून अप्रुव्ह करून घेतला आहे. परंतू प्रवेश घेतलेला नाही, असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दूरूस्तीमध्ये आहे. तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरून प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले असे सर्व उमेदवार अर्ज भरू शकतात. अर्ज ऑनलाईन अप्रुव्ह केल्याशिवाय उमेदवाराचा प्रक्रियेत समावेश होणार नाही. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याने स्वत:च्या ई-मेल लॉगिनमधून प्रिंट घ्यावयाची आहे. त्यांनतर अध्यापक विद्यालयात चार दिवसाच्या आत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश घ्यावयाचा आहे.
प्रवेश प्रक्रियेच्या या विशेष फेरीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही. याबाबत सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पध्दतीने प्रवेश करण्यात येणार आहे.