शेतीला पुरक व्यवसाय म्हणून शेळीपालन व्यवसाय योजनेकरिता अर्ज आमंत्रित
30 सप्टेंबर पर्यंत अर्ज करावे
भंडारा,दि.24:- प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प भंडारा अंतर्गत भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275 (1) योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या वनहक्क कायदा 2006 अंतर्गत वनपट्टे प्राप्त असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीला पुरक व्यवसाय म्हणून 10 शेळ्या व 1 बोकड अशी शेळीपालन व्यवसाय योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूक लाभार्थ्यांनी अर्ज प्राप्त करण्याकरिता व भरलेले अर्ज सादर करण्यासाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत 30 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी निरज मोरे यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा. अर्ज सादर करतांना अर्जासोबत सक्षम अधिकाऱ्याचे जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, वनहक्क कायद्याव्दारे वनपट्टा प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक प्रथम पानाची सत्यप्रत, 7/12 दाखला, 8-अ चा उतारा, उत्पन्न दाखला तहसीलदार यांनी दिलेला तसेच सदर योजनेचा लाभ यापूर्वी आदिवासी विभाग अथवा इतर कोणत्याही शासकीय विभागाकडून घेतला नसल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.