चंद्रपूर शहरात ३९५६ गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन
६० गणेशभक्तांनी घेतला मनपाच्या फिरत्या विसर्जन कुंडाचा लाभ
चंद्रपूर, ता. १५ : गणेशत्सवामुळे चंद्रपूर शहरात भक्तिमय वातावरण असून, चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत मागील ५ दिवसापासून पर्यावरणपूरक विसर्जन सुरु आहे. आतापर्यंत एकही पीओपी मूर्ती आढळून आली नाही. १४ सप्टेंबरच्या रात्री १२ अखेरपर्यंत एकूण ३९५६ गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन पार पडले. याशिवाय “विसर्जन आपल्या दारी” उपक्रमात एकूण ६० गणेशभक्तांनी फिरत्या कृत्रिम विसर्जन कुंडाचा लाभ घेतला.
चंद्रपूर मनपाच्या वतीने यंदा पूर्णतः पर्यावरणपूरक उत्सवावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी शहरात २७ ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड व १९ निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. झोन क्रमांक १ मध्ये मनपा झोन कार्यालय, संजय गांधी मार्केट नागपूर रोड, डॉ. बाबा आमटे अभ्यासिका, दाताळा रोड, इरई नदी, तुकुम प्रा. शाळा (मनपा, चंद्रपूर), झोन क्रमांक – २ मध्ये गांधी चौक, लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा पठाणपुरा रोड, समाधी वार्ड, शिवाजी चौक, अंचलेश्वर रोड, विठोबा खिडकी, विठ्ठल मंदीर वार्ड, रामाळा तलाव, हनुमान खिडकी, महाकाली प्रा. शाळा, महाकाली वार्ड, झोन क्रमांक – ३ मध्ये नटराज टाॅकीज (ताडोबा रोड), सावित्रीबाई फुले प्रा. शाळा बाबुपेठ, मनपा झोन कार्यालय, मूल रोड, बंगाली कॅम्प चौक आदी ठिकाणी कृत्रिम विसर्जन व्यवस्था
करण्यात आली आहे.
– झोननिहाय विसर्जन
झोन १: १२४९
झोन २ : १६१९
झोन ३ : १०२८
एकूण विसर्जन : ३९५६
—————
– विसर्जन आपल्या दारी उपक्रमांतर्गत ”फिरते विसर्जन कुंड” व्यवस्था करण्यात आली आहे. फोन केल्यास विसर्जन रथ आपल्या परिसरात येईल.
– गुरुवारी स्पर्धेची अंतिम तारीख
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी यंदा महानगरपालिकेच्या माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून पर्यावरणस्नेही बाप्पा स्पर्धा घेण्यात येत आहे. यात घरगुती गणेश उत्सव आणि सार्वजनिक गणेश मंडळांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेची अंतिम तारीख १६ सप्टेंबर आहे. स्पर्धेचे मूल्यमापन १७ सप्टेंबर रोजी होईल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://tinyurl.com/5a5fru2v लिंकवर जाऊन खालील माहिती भरावी. स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.
– ८३० गणेश भक्तांना जास्वंद रोपटे भेट
महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून यंदा पर्यावरणस्नेही बाप्पा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यानुसार पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून मनपाच्या कृत्रिम विसर्जन कुंडात विसर्जन करणाऱ्या गणेशभक्तांना जास्वंदाचे रोपटे आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आतापर्यंत रामाळा तलाव आणि इरई नदीच्या परिसरामध्ये विसर्जन करण्यासाठी आलेल्यांनी कृत्रिम कुंडाचा लाभ घेतल्याबद्दल ८३० गणेश भक्तांना जास्वंदाचे रोपे देऊन सन्मानित करण्यात आले.