मोकाट जनावरांवर मनपा करणार कारवाई
चंद्रपूर, ता. २७ : शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरे रस्त्यावर उभे राहून वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर मलमुत्र विर्सजन करुन अस्वच्छता करीत आहे. स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दररोज शहरात गस्त घालून मोकाट जनावरांवर कार्यवाही करावी, अशा सूचना मनपाचे अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिल्यात.
शहरातील मुख्य मार्गावर मोकाट जनावरे ठाण मांडून बसून राहात असल्याने वाहनधारकांचा अपघात होण्याची शक्यता अधिक असते. या बाबत अनेक नागरिक आणि नगरसेवकांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे जनावरांच्या मालकांनी आपल्या जनावरांची योग्य बंदोबस्त करावा, अन्यथा कारवाई केली जाणार आहे. मनपाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यानी दररोज शहरात गस्त घालून मोकाट जनावरा बाबत कार्यवाही करावी, शहरामध्ये कुठेही मोकाट जनावरे आढळून येणार नाही, याबाबत संपुर्ण कार्यवाही करावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त विपीन पालिवाल यांनी दिले.