रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या नियमांमध्ये शिथिलता
सुधारित धोरणास मनपाची मंजुरी; विविध मॉडेलला प्रमाणित करणार
चंद्रपूर, ता. २५ : शहरातील अनेक निवासी, वाणिज्य, औद्योगिक व इतर वापराच्या नवीन बांधकामाच्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिगसाठी आवश्यक जागा उपलब्ध नसल्यास उपक्रम राबविण्यास अडचण निर्माण होणार नाही, यासाठी नियमांमध्ये शिथिलता देत सुधारित धोरणास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. त्यानुसार रेन वॉटर हार्वेस्टिगसाठी पर्यायी साधनांच्या वापरातून विविध मॉडेलला प्रमाणित करण्यात येणार आहे.
रेन वॉटर हार्वेस्टिगसंदर्भात महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आयुक्त श्री. राजेश मोहिते, उपमहापौर श्री. राहुल पावडे, स्थायी समिती सभापती श्री. रवी आसवानी, अतिरिक्त आयुक्त श्री. विपीन पालीवाल, उपायुक्त श्री. अशोक गराटे, नगररचनाकार श्री. आशीष मोरे यांची उपस्थिती होती.
निवासी / वाणिज्य / औद्योगिक व इतर वापराच्या नवीन बांधकामाच्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिगचे बांधकामासाठी आवश्यक जागा उपलब्ध असल्यास / नसल्यास त्यांनी छतावरचे संपुर्ण पाणी पाईपव्दारे पर्याप्त आकारमानाचा शोष खड्डा करुन सोडल्यास त्यास रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणुन प्रमाणीत करावे, अशा सूचना आयुक्त राजेश मोहिते यांनी सर्व सहायक आयुक्तांना दिल्या आहेत.
रेन वॉटर हार्वेस्टिगच्या बांधकामासाठी आवश्यक जागा उपलब्ध असल्यास त्यांनी छतावरचे संपुर्ण पाणी फिल्टर मिडीयाचा वापर करुन पाईपाव्दारे विहिरीत किंवा बोअरवेलमध्ये सोडल्यास त्यास रेन हार्वेस्टिंग म्हणून प्रमाणित करण्यात येणार आहे.
जागा उपलब्ध नसल्यास दोन, तीन किंवा त्यापेक्षा जास्त मालमत्ताधारकांनी पर्याप्त आकारमानाचा शोष खड्डा करुन त्यात पावसाचे पाणी मुरविल्यास किंवा सहाय्यक आयुक्त यांच्या सहमतीने मनपा मालकीच्या मोकळ्या जागी पर्याप्त आकारमानाचे शोष खड्डा करुन किंवा मनपा मालकीच्या विहीरीत /पावसाचे पाणी मुरविल्यास त्यास रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणुन प्रमाणित करण्यात येणार आहे.