स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा पुरवठा
Ø अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर दि. 24 ऑगस्ट : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरविणे या योजनेत आमूलाग्र बदल करण्यात आला असून सदर योजनेअंतर्गत लाभार्थी बचत गटांना देण्यात येणारे अर्थसहाय्य हे वस्तू स्वरूपात न देता मंजूर अर्थसहाय्याची रक्कम रुपये 3.15 लाख बचत गटांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
अशा आहेत योजनेच्या अटी व शर्ती:
स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्राचे रहिवासी असावे, स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत, स्वयंसहायता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत, बचत गटाचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते असावे व सदरचे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असावे. स्वयंसहाय्यता बचत गटाने खरेदी केलेला मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने हे भारत सरकारचे मिनिस्ट्री ऑफ अग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर डिपार्टमेंट ऑफ एग्रीकल्चर,को-ऑपरेशन अँड फार्मर्स वेल्फेअर यांनी निर्धारित केल्यानुसार फार्म, मशिनरी, ट्रेनिंग आणि टेस्टिंग इन्स्टिट्यूट यांनी टेस्ट करून जाहीर केलेल्या उत्पादकांच्या यादीतील परिमाणानुसार असावेत. मात्र बचत गटांना शासनाने त्या-त्या जिल्ह्यासाठी निश्चित करून दिलेल्या उद्दिष्टानुसार अर्थसहाय्य मंजूर करून बँक खात्यात जमा करण्यात येईल. योजनेच्या लाभासाठी निवड झालेल्या स्वयंसहाय्यता बचत गटांनी खरेदी केलेले मिनी ट्रॅक्टर चालविण्याचे अधिकृत संस्थेकडून प्रशिक्षण घेऊन त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
बचत गटाने खरेदी केलेले मिनी ट्रॅक्टर, ट्रॅक्टर व उपसाधने अर्थसहाय्य घेतल्यानंतर विकता येणार नाही किंवा गहाण ठेवता येणार नाही. तशा आशयाचे हमीपत्र स्वयंसहायता बचत गटाला द्यावे लागेल. तसेच पुढेही प्रत्येक वर्षी 10 वर्षापर्यंत त्याबाबत प्रमाणपत्रास मंजुरी देणाऱ्या सक्षम प्राधिका-याकडे सादर करणे बंधनकारक असेल. तसेच ज्या स्वयंसहायता बचत गटांनी पावर ट्रिलर किंवा मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतला आहे, त्या बचत गटांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
तरी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र स्वयंसहायता बचत गटांनी 22 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीकरीता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दुध डेअरी रोड, जलनगर वार्ड, चंद्रपुर येथील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.