जागतिक आदिवासी अस्मिता स्मरण
कार्यक्रमात अधिक संख्येने सहभागी व्हा – नीरज मोरे यांचे आवाहन
- 52 आठवडे चालणार ईव्याख्यानमाला
भंडारा,दि.22: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने आदिवासी विकास नागपूरचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनात जागतिक आदिवासी अस्मिता स्मरण कार्यक्रमांतर्गत सोमवार 23 ऑगस्टपासून दर सोमवारी 52 आठवडे या ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. यूट्यूबच्या माध्यमातून होणाऱ्या या ऑनलाईन व्याख्यानमालेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी नीरज मोरे यांनी केले आहे.
आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षणाची आवड, जिज्ञासा, नवचैतन्य निर्माण करण्यासाठी या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत आहे. या व्याख्यानमालेत गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कन्ना मडावी, नागपूर जिल्ह्यातील व्याहाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुषमा धुर्वे, यवतमाळ जिल्ह्यातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. ब्रह्मानंद पुंगाटी, डॉ. राहुल मार्गिया, नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. देवेंद्र मडावी यांचे मार्गदर्शन होणार आहे. ही व्याख्यानमाला 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता https://youtu.be/MC0C8gp97yw या लिंकद्वारे थेट प्रक्षेपण होणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी, विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन भंडाराचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी नीरज मोरे यांनी केली आहे.