विद्यार्थ्यांमध्ये गुरूबद्दल आदर निर्माण करा
महापौर राखीताई संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन
नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाची शैक्षणिक कार्यशाळा
चंद्रपूर, ता. १९ : पूर्वी गुरुजींबद्दल आदर होता. आता थ्रीजी आणि फोरजीच विद्यार्थांचा गुरु बनलाय. शिक्षकांनी विद्यार्थामध्ये गुरूबद्दल आदर निर्माण करावा, असे प्रतिपादन महापौर राखीताई संजय कंचर्लावार यांनी केले.
महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघ, शाखा महानगरपालिका चंद्रपूरच्या वतीने राणी हिराई सभागृह, नवीन प्रशासकीय भवन येथे
आयोजित शैक्षणिक कार्यशाळेत बोलत होत्या. यावेळी मंचावर महाराष्ट्र नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाचे राज्यध्यक्ष अर्जुन कोळी, सुभाष कोल्हे, सुनील खेलूरकर, अरुण पवार, साधना साळुंखे, मनपाचे शिक्षण प्रशासन अधिकारी नागेश नीत यांची उपस्थिती होती.
यावेळी महापौर राखीताई संजय कंचर्लावार म्हणाल्या, कोविड काळात विद्यार्थांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी पोषण आहारावर भर देण्याची गरज आहे. आज कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण द्यावे लागत आहे. मात्र, चंद्रपूर मनपाच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षण दिले. म्हणूनच मनपाच्या शिक्षकाचे कौतुक करावेसे वाटते. घरी जरी आई पहिली गुरु असली, तरी विद्यार्थ्यांचे जीवन अधिक समृद्ध करणयासाठी आणि त्यांना घडविण्याचे मोठे काम शिक्षक करीत असतात, त्यामुळे मी सर्वाना मनापासून सॅल्यूट करते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक व प्रयोगशील शिक्षक अर्जुन कोळी यांचा महापौर राखीताई संजय कंचर्लावार यांच्या हस्ते शाल-श्रीफळ- स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अर्जुन कोळी हे सातारा जिल्ह्यातील कराड नगरपालिका शाळेचे मुख्याध्यापक आहेत. देशातील सर्वाधिक पटसंख्या असलेली शाळा म्हणून नावलैकिक मिळवला आहे. राज्यातील पालिका शाळांत सर्वप्रथम ‘आयएसओ’ मानांकन मिळवण्याचा मानही या शाळेच्या नावावर आहे. नवनवीन उपक्रमांमुळे राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागासाठी ‘रोल मॉडेल’ ठरलेल्या या शाळेच्या एकूणच यशात मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांचा सिंहाचा वाटा आहे. सुरवातीला २६७ पटसंख्या असलेल्या या शाळेचा संख्यात्मक व गुणात्मक दर्जा वाढवण्याचे आव्हान घेत श्री. कोळी यांनी आज पटसंख्या दोन हजारावर नेली. पटसंख्या वाढीसाठी शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत श्री. कोळी यांनी घरोघरी जावून पालकांना शाळेचे महत्त्व पटवून दिले. त्यात प्रामुख्याने झोपडपट्टीमधील पालकांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना अर्जुन कोळी म्हणाले, इंटरनॅशनल स्कुल हे श्रीमंत लोकांच्या मुलांसाठी आहे. पण, अशा स्कुल गरीब विद्यार्थ्यांसाठी निर्माण झाल्या पाहिजेत. शिक्षकांनी स्वतःमध्ये बदल करून शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग करावेत, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील आत्राम यांनी केले. कार्यशाळेच्या आयोजनाकरिता नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या सरचिटणीस सौ. परिणय वासेकर, कार्याध्यक्ष शरद शेंडे, कार्याध्यक्ष अमोल कोटनाके, नागपूर विभाग अध्यक्ष नागेश नीत तथा शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले.