कृषी विभाग करणार आपत्कालीन समस्येवर मात
Ø क्रॉपसॅप अंतर्गत जैविक निविष्ठांचा 400 लिटर पुरवठा
चंद्रपूर दि. 17 ऑगस्ट : क्रॉपसॅप सन 2021-22 अंतर्गत आपात्कालीन समस्येवर मात करण्यासाठी जैविक निविष्ठांचा 400 लिटर पुरवठा करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावातील गट प्रतिनिधी, कृषी मित्र तसेच प्रगतशील शेतकरी यांना 1 लिटर मेटारायझियम 50 टक्के सूट या प्रमाणात पुरवठा करण्यात येणार आहे.
या 1 लिटर मेटारायझियम पासून 200 लिटर मेटारायझियम तयार होते. त्यामुळे एकंदरीत जिल्ह्यात 80 हजार लिटर मेटारायझियम तयार होणार आहे. सदरचे मेटारायझियम 10 रुपये प्रति लिटर याप्रमाणे गावातील स्थानिक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. 80 हजार लिटर मेटारायझियममुळे 8 हजार हेक्टर भात लागवड क्षेत्रावरील तुडतुडे किडींचे नियंत्रण होण्यास मदत मिळणार आहे. रासायनिक औषधांच्या फवारणीकरीता हेक्टरी 2 हजार रुपये खर्च होतो. म्हणजेच रासायनिक औषधाने 8 हजार हेक्टर क्षेत्र नियंत्रित करण्याकरिता 1.60 कोटी इतका खर्च शेतकऱ्यांचा होतो.
मेटारायझियमचा वापर केल्यास शेतकऱ्यांना हेक्टरी 5 लिटरची आवश्यकता असते. अशा दोन फवारण्या केल्यास तुडतुडे कीड पूर्णतः नियंत्रित होते. यावरून शेतकऱ्यांना हेक्टरी 100 रुपये खर्च होणार म्हणजेच 8 हजार हेक्टर क्षेत्र नियंत्रित करण्याकरीता शेतकऱ्यांचे फक्त 8 लाख रुपये खर्च होणार आहे. सदर उपक्रमामुळे रासायनिक औषधावरील मोठा खर्च कमी होऊन शेतकऱ्यांची आर्थिक बचत होणार आहे. तसेच जैविक किटकनाशकांच्या वापरामुळे निसर्गाचे रक्षण होऊन शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करतील, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी कळविले आहे.