मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास
प्रशिक्षण कार्यक्रमात भंडारा जिल्हा प्रथम
- 300 उमेदवारांचे उदिष्ट पूर्ण
- संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी मदत
- कुशल मनुष्यबळ मिळणार
भंडारा,दि.17:- कोरोनासारख्या महामारीचा सामना करतांना राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण होता. प्रचंड मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण झाली होती. त्यातुलनेत आपल्याकडे कुशल मनुष्यबळाची करतरता प्रामुख्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भासली होती. ही बाब लक्षात घेता कौशल्य विकास विभागाने मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम ही योजना जुलै महिन्यात राज्यभर सुरू केली. या योजनेत तीन महिन्यात 20 हजार उमेदवारांना वैद्यकीय क्षेत्रात मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्याला 300 उमेदवारांचे उदिष्ट देण्यात आले होते. 300 उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू करण्यात भंडारा जिल्हा विदर्भात पहिल्या क्रमांकावर आहे. पुढील तीन महिन्यात जिल्ह्याला 300 उमेदवारांचे प्रशिक्षित मनुष्यबळ प्राप्त होणार आहे.
मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमास 8 जुलै 2021 पासून सुरुवात झाली. सदर उपक्रमाव्दारे हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडीकल क्षेत्रातील 36 अभ्यासक्रमांचे कौशल्य प्रशिक्षण प्रदान करण्याचा महत्वकांक्षी उपक्रम शासनाने राबविला. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय रुग्णालय तसेच उत्कृष्ट खाजगी रुग्णालये यांना प्रशिक्षणासह ऑन जॉब ट्रेनिंग देण्यात येणार आले. अतिशय सोप्या पध्दतीने व दर्जेदार पायाभूत सुविधा असलेल्या रुग्णालयात हे प्रशिक्षण सुरू आहे.
जिल्ह्यात सामान्य रुग्णालय भंडारा, उपजिल्हा रुग्णालय तुमसर, ग्रामीण रुग्णालय लाखांदूर, ग्रामीण रुग्णालय लाखनी, ग्रामीण रुग्णालय पालांदुर, उपजिल्हा रुग्णालय साकोली, ग्रामीण रुग्णालय सिहोरा, ग्रामीण रुग्णालय मोहाडी, ग्रामीण रुग्णालय पवनी, अनुराधा पॅरामेडीकल कॉलेज तुमसर, भंडारा पॅरामेडीकल कॉलेज भंडारा या ठिकाणी विविध बॅच मध्ये व विविध ट्रेडमध्ये उमेदवार प्रशिक्षण घेत आहे.
कोरोना परिस्थितीत जनआरोग्य सेवा आणि संसर्ग प्रतिबंध करतांना प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता प्रकर्षाने समोर आली. आरोग्य यंत्रणेवर आलेला अतिरिक्त ताण लक्षात घेऊन भावी काळात प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम या अभिनव व महत्वकांक्षी उपक्रमाची राज्यात सुरुवात करण्यात आली. प्रशिक्षित उमेदवारांना आरोग्य सेवेची शाश्र्वती राहील तसेच रोजगार निर्मीती होणार आहे. सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास विभाग शैलेश भगत व जिल्हा समन्वयक सोनू उके हे या प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून उत्तम प्रकारे काम पाहत आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भंडारा जिल्ह्यातही आरोग्य क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाचा तुटवडा जाणवला होता. आता 300 उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत. येणाऱ्या काळात हे प्रशिक्षित मनुष्यबळ आरोग्य सेवेच्या उपयोगी येणार आहे. कुशल मनुष्यबळाची कमी या प्रशिक्षणामुळे दूर होण्यास मदत मिळणार आहे. -जिल्हाधिकारी संदीप कदम |