‘त्या’ गौण खनिजाचा परिमाणानुसारच पंचनामा
Ø दीड वर्षात अवैध उत्खनन करणा-यांकडून 50 लक्ष रुपयांचा दंड वसूल
चंद्रपूर दि. 13 ऑगस्ट : कोरपना तालुक्यात जप्त केलेल्या अवैध गौण खनिजाचा पंचनामा परिमाणानुसारच करण्यात आला आहे. तसेच गत दीड वर्षात अवैध उत्खनन करणा-यांकडून 50 लक्ष रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे कोरपनाचे तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांनी कळविले आहे.
केटीसी कंपनीमध्ये विनापरवाना मुरूम व गिट्टी बॉर्डर साठवणूक केल्याबाबतची तक्रार कोरपना तहसील कार्यालयास दूरध्वनीद्वारे कळवण्यात आली होती. त्या अनुषंगाने गडचांदूरचे तलाठी एम.एस. अन्सारी यांनी 4 ऑगस्ट 2021 रोजी मौजा थुट्रा येथे अब्दुल मजिद अब्दुल हमीद खान यांच्या मालकीच्या पेट्रोल पंप येथे पंचनामा केला असता पंचनाम्यानुसार 2 ब्रास मुरूम व 15 ब्रास बोल्डर गिट्टीचे ढिगारे
असल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे. त्यानुसार सदर प्रकरण पंजीबद्ध करून नियमानुसार पुढील कार्यवाही सुरू आहे. मात्र असे असतांनाही सदर ठिकाणी 55 ब्रास मुरूम गिट्टी असून तहसीलदारांनी 17 ब्रास दाखविली, अशा आशयाचे खोटे वृत्त प्रसारीत करून दिशाभूल करण्यात येत आहे, असे तहसीलदारांनी स्पष्ट केले आहे. मौक्यावर आलेल्या गौण खनिजाचे परिमाणानुसारच पंचनामा करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे सन 2020-21 मध्ये तहसील कार्यालय, कोरपना अंतर्गत गौणखनिज मध्ये 3 कोटी 50 लक्ष रुपये वसूल करण्यात आले असून त्यापैकी अवैध उत्खनन व वाहतुकीचे एकूण 45 प्रकरणात रुपये 48 लक्ष 70 हजार 600 रुपये दंडाचे आदेश पारित करण्यात आले. त्यापैकी रुपये 45 लक्ष 12 हजार 300 रुपये वसूल करण्यात आले आहे.
तसेच सन 2021-22 मध्ये माहे जुलै 2021 अखेर 14 अवैध वाहतूक प्रकरणात रुपये 16 लक्ष 70 हजार 240 रुपये दंडाचे आदेश पारित करण्यात आले असून त्यापैकी रुपये 5 लक्ष 50 हजार रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांनी दिली.