आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा
भंडारा,दि.13:- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे दिनदर्शिका नुसार 12 ऑगस्ट 2021 रोजी मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था शहापूर भंडारा येथे आंतरराष्ट्रीय युवक दिवस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा अंजू शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.
मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष नशिने, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुहास भोसले, सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती सी. वाय. नेवारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भुषण पवार, अधिवक्ता विजय रेहपाडे यांची उपस्थिती होती.
श्रीमती शेंडे म्हणाल्या, देशाची सेवा करण्यासाठी जी शक्ती पाहीजे ते युवकांकडे असायला पाहीजे. मदतीसाठी एकमेकांना हाक द्या आणि हाक घ्या, असे आवाहन त्यांनी यावेळी दिले. कोणत्याही प्रकारच्या समस्येवर कशाप्रकारे मात करता येते हे उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले. कोणत्याही विद्यार्थ्यांचे रॅगिंग करुन कुणाचाही काही फायदा होणार नाही. सोशल मीडियाचा चांगल्या कामासाठी उपयोग करा. सोशल मीडिया हे सायकॉलॉजीकल हॅकर बनलेले आहे. त्यामुळे त्याचा काळजीपूर्वक व आवश्यक तेवढाच वापर करा, असे त्यांनी सांगितले.
अधिवक्ता विजय रेहपाडे यांनी रॅगिंग विषयी माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक भुषण पवार यांनी सायबर क्राईम याबाबत मार्गदर्शन केले. सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती सी. वाय. नेवारे यांनी ट्रॅफिक नियमांबाबत मार्गदर्शन केले व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुहास भोसले यांनी नागरिकांचे मुलभूत कर्तव्य याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक अमित मानापूरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राध्यापक योगेश शेंडे यांनी मानले. सदर कार्यक्रमात प्राध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.