कोरोना काळात जिल्हा प्रशासनाचे काम उल्लेखनीय – उपसभापती निलम गोऱ्हे
Ø कोरोनामुक्त गावातील सरंपचांनी केले अनुभव कथन
चंद्रपूर, दि. 11 ऑगस्ट : कोरोनाचे संकट हे एका महायुध्दाप्रमाणे आहे. या लढ्यात शासन, प्रशासन, सामाजिक संघटना, नागरिक सर्व एकजुटीने लढत आहे. जिल्ह्यातील 1200 गावांपैकी 313 गावे सुरवातीपासून कोरोनामुक्त ठेवण्यास प्रशासनाला यश आले असून सद्यस्थितीत बहुतांश तालुक्यांची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अतिशय चांगले उपक्रम राबविले असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती निलम गो-हे यांनी दिली.
प्रशासनाने राबविलेल्या उपाययोजनांबाबत नियोजन सभागृहात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी आमदार दुष्यंत चतुर्वेदी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी, पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रोहन घुगे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते आदी उपस्थित होते.
कोरोनाकाळात खनीज विकास निधीचा सर्वात चांगला उपयोग चंद्रपूर जिल्ह्याने केला, असे सांगून उपसभापती गो-हे म्हणाल्या, चंद्रपूरचा हा आदर्श इतरही जिल्ह्यांनी घ्यावा. तसेच जनजागृतीकरीता गावपातळीवर लाऊडस्पीकर सिस्टीमचा चांगला उपयोग करण्यात आला. गावपातळीवर व्हॉट्सॲप ग्रुप करणे, रोजगार हमी योजनेच्या कामावरील नागरिकांची ॲन्टीजेन टेस्ट करणे, ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून कोरोनाविषयक उपाययोजनेसाठी उपक्रम राबविणे आदी बाबी करण्यात आल्या आहेत. आपले गाव, आपले शहर, आपला जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याची कार्यपध्दती वेगवेगळी राहिली आहे. या काळात सर्वांनाच खूप काम करावे लागले व आजही करावे लागत आहे.
कोरोनामुळे मृत पावलेल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. एक पालक किंवा दोन्ही पालक गमाविलेल्या बालकांचे संगोपन, त्यांचे पालनपोषण, शिक्षण, त्यांना आर्थिक मदत मिळवून देणे आदी बाबी महत्वाच्या आहेत. जी बालके अनाथ झाली आहेत व जेथे मुलींचे वय 10 वर्षांच्यावर व 18 वर्षाखाली आहे, तेथे बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा कुटुंबाकडे प्रशासनाने गांर्भियाने लक्ष द्यावे. तसेच ही बालके बालमजूर म्हणून कुठेही काम करतांना आढळू नये, यासाठी अशा कुटुंबाचा नियमित आढावा घ्यावा.
कोरोनामुळे मृत पावलेल्या कुटुंबातील विधवा स्त्रिया, बालके आदींची शहरी, ग्रामीण, अतिग्रामीण, शेतीवर अवलंबून असणारे कुटुंब अशी वर्गवारी करावी. जेणेकरून शेतीच्या टप्प्यावर त्यांना काही गरज आहे का, याची माहिती घेऊन अशा कुटुंबांना मदत करता येईल. त्यामुळे त्यांची शेतीही सुरक्षित राहील व इतरांचा त्यावर कब्जा होणार नाही, अशा त्या म्हणाल्या.
यावेळी मुल तालुक्यातील राजगड येथील सरपंच चंदू पाटील मारकवार, राजुरा तालुक्यातील गौरी येथील आशा बबन उरकुडे, भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील नयन जांभुळे, दुर्गापूर येथील पूजा मानकर आदींनी आपापल्या गावात केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, कोरोनामुक्त गावातील सरपंच, आशा स्वयंसेविका यांच्यासह इतर विभगाचे अधिकारी उपस्थित होते.