जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव सप्ताहाचे उद्घाटन
चंद्रपूर दि. 9 ऑगस्ट : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून कृषी विभागामार्फत जिल्हाभरात रानभाजी महोत्सव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात आज (9 ऑगस्ट) रोजी कृषी भवन येथे रानभाजी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रतिभा धानोरकर उपस्थित होत्या. यावेळी कृषी सभापती सुनील उरकुडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी उपसंचालक रवींद्र मनोहरे, कृषी विकास अधिकारी श्री. दोडके, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, मंडळ कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, तंत्र अधिकारी श्री. मादेवार तसेच कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले म्हणाल्या की, रानभाज्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्यांचे वेगळे महत्त्व आहे. शहरातील नागरिकांना रानभाज्याविषयी ओळख व त्यांची माहिती व्हावी, व या रानभाज्यांचा समावेश त्यांच्या दैनंदिन आहारात व्हावा, यासाठी कृषी विभागामार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रानभाज्यांची ओळख व संवर्धन यामध्ये आदिवासी बांधवांचे फार मोठे योगदान आहे. आदिवासी बांधव तसेच शेतकरी वर्ग या रानभाज्यांचे मोठ्या प्रमाणात सेवन करतात. त्यामुळे कोरोना सारख्या महामारीच्या काळातही त्यांचे आरोग्य उत्तम होते. पचनासाठी, श्वसनासाठी व शारीरिक स्वास्थ्यासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी या रानभाज्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे शहरी भागातील नागरिकांनी या रानभाजी महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, कृषी विभागामार्फत आगळावेगळा व स्तुत्य असा उपक्रम राबविला जात आहे. रानभाज्यांचे महत्त्व आपल्या जीवनात महत्त्वाचे आहे. कोरोना काळात रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याचे काम या रानभाज्यानींच केले आहे. नागरिकांनी आपल्या दैनंदिन आहारात या रानभाज्यांचा समावेश केल्यास कोणत्याही औषधोपचाराची आवश्यकता भासणार नाही. रानभाज्यांचे पॅकिंग करून या रानभाज्या बचत गटाच्या माध्यमातून हॉटेलमध्ये पुरविल्यास, विक्री केल्यास तेथे येणाऱ्या ग्राहकांना या भाज्यांचा आस्वाद घेता येईल व रानभाज्यांची विक्री सुद्धा होईल. ग्राहकांना आरोग्यपूर्ण भाज्या उपलब्ध होण्यासोबतच शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
यावेळी बांबूचे वायदे, काटवल, धोपा, गोपनवेल, सुरुंग, शेवगा, अळु, चिवळ, घोळभाजी तसेच इतर प्रकारच्या रानभाज्या महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध होत्या. कार्यक्रमाचे संचालन मंडळ कृषी अधिकारी भास्कर गायकवाड तर आभार कृषी उपसंचालक रवींद्र मनोहरे यांनी मानले.