जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक
रस्ते अपघातावर नियंत्रणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे – जिल्हाधिकारी
चंद्रपूर दि.7 ऑगस्ट: चंद्रपूर जिल्ह्यातील 28 ब्लॅक स्पॉट ( अपघात प्रवणक्षेत्र) यापैकी 18 ब्लॅक स्पॉट वरील लाँग टर्म कामे प्रलंबित असल्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग व राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण या विभागांनी 10 ब्लॅक स्पॉटवरील लाँग टर्म कामे पूर्ण झाले असल्याचे स्पष्ट केले. त्या अनुषंगाने उर्वरित 18 ब्लॅक स्पॉट अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. जुनोनकर, कार्यकारी अभियंता श्री. भास्करवार, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रोजेक्ट डायरेक्टर आशुतोष पिपळे, राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता श्री. बोबडे, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक हृदय नारायण यादव तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक स्मिता सुतवणे प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. गुल्हाणे म्हणाले की, महानगरपालिका प्रशासनाने चंद्रपूर शहरातील ट्राफिक सिग्नल व्यवस्थेचे सर्वेक्षण करून आवश्यक ठिकाणी दुरुस्ती करत पूर्ववत करावे व त्या संदर्भात समितीला अहवाल सादर करावा. तसेच जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात पावसाळ्यामध्ये रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी संबंधित ठेकेदाराने साईन बोर्ड, रिफ्लेक्टर लावणे अनिवार्य आहे. जेणेकरून अपघात होणार नाही. रिप्लेक्टर,साईन बोर्ड लावलेले आढळून न आल्यास संबंधित ठेकेदारावर कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व राज्य महामार्ग विभाग प्रमुखांना दिल्या.
शहरातील अवैध बस पार्किंग बाबत महानगरपालिकेचे अधिकारी व बस ऑपरेटर यांची बैठक आयोजित करावी. अनधिकृतरित्या स्पीड ब्रेकर व दुभाजक यांची तोडफोड झाली असल्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभाग यांनी सर्वेक्षण करून माहिती समितीसमोर सादर करावी. परिवहन व पोलीस विभागाने बेशिस्त वाहन चालकावर दंडात्मक कार्यवाही करून त्यांचे समुपदेशन करावे. दोषी वाहनचालकाची अनुज्ञप्ती (लायसन्स) रद्द करण्यात यावे तसेच जिल्ह्यातील विद्यार्थी युवावर्ग यांना रस्ता सुरक्षा प्रबोधनात्मक जनजागृती वर भर द्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सदर बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.