सोमवार ते शुक्रवार बाजारपेठेची वेळ आता रात्री 8 वाजेपर्यंत
Ø शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत तर रविवारी संपुर्णत: बंद
चंद्रपूर दि. 3 ऑगस्ट : सर्व अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकाने, आस्थापना (शॉपिंग मॉल सह) सुरु ठेवण्याची वेळ सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत वाढविण्यात आली असून सदर दुकाने शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंतच सुरू राहतील. तर अत्यावश्यक दुकाने वगळता सर्व दुकाने व मॉल रविवारी संपूर्णतः बंद राहतील.
सद्यस्थितीत स्तर-3 मधील लागू असलेल्या निर्बंधामध्ये केलेल्या सुधारणा चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि. 3 ऑगस्ट 2021 पासून लागू करण्यात येत आहे.
सर्व सार्वजनिक उद्याने व क्रीडांगणे व्यायाम, चालणे, धावणे सायकलींग करिता सुरू राहतील. सर्व शासकीय व खाजगी कार्यालय संपूर्ण क्षमतेने सुरू राहतील. ज्या कार्यालयामध्ये यापूर्वी वर्क फ्रॉम होम पद्धतीने कामकाज सुरू होते ते यानंतरही सुरू राहतील. सर्व कृषी विषयक कामे, बांधकाम, औद्योगिक प्रक्रिया, मालवाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू राहतील.
व्यायाम शाळा, योगा केंद्र, केस कर्तनालय, ब्युटीपार्लर, स्पा इ. आस्थापना सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत तसेच शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेसह वातानुकूलित यंत्राच्या वापराशिवाय सुरू ठेवता येतील. सदर आस्थापना रविवारी संपूर्णतः बंद राहतील.
सर्व उपाहारगृहे, रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के आसनक्षमतेने डायनिंगसाठी कोरोना वर्तणूकविषयक नियमांचे पालन करून सुरू राहतील. तथापि दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत केवळ पार्सल, घरपोच सुविधा सुरू राहतील. तसेच शनिवार व रविवार पूर्णपणे बंद राहतील. केवळ पार्सल व घरपोच सुविधा सुरू राहतील.
जिल्ह्यातील सर्व धार्मिकस्थळे, प्रार्थनास्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. सर्व सिनेमागृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स (सिंगलस्क्रीन तसेच मॉलमधील) पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. शाळा व महाविद्यालयाकरीता राज्यशिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे आदेश लागू राहतील.
कोणत्याही नागरिकास रात्री 9 ते सकाळी 5 या वेळेत बाहेर पडण्यास प्रतिबंध राहील. गर्दी टाळण्याकरिता वाढदिवस साजरा करणे, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक प्रचार, मेळावे, निषेध मोर्चे यावरील निर्बंध पुर्ववत राहतील.
नागरिकांनी सर्व कोरोना वर्तणूक विषयक नियमांचे पालन करावे. मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे इत्यादी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे प्रत्येक नागरिकास बंधनकारक असेल.
सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. सदर आदेश संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि.3 ऑगस्ट 2021 पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील, असे जिल्हादंडाधिकारी अजय गुल्हाने यांच्या आदेशात नमूद आहे.