मौखिक स्वच्छता दिन 1 ऑगस्टला
- 1 ते 7 ऑगस्ट मौखिक स्वच्छता सप्ताह
भंडारा,दि.31:- राष्ट्रीय मौखिक कार्यक्रमाअंतर्गत मौखिक आरोग्य जनजागृतीसाठी 1 ऑगस्ट 2021 रोजी मौखिक स्वच्छता दिन व 1 ते 7 ऑगस्ट मौखिक स्वच्छता सप्ताह संपूर्ण भंडारा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या राहणीमानासाठी व सर्वांगीण विकासासाठी मौखिक आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे. मौखिक आरोग्याचा व्यक्तीच्या वाढीवर, विकासावर, शिक्षणावर व सामाजिक आत्मनिर्भरतेवर परिणाम होतो. म्हणून चांगल्या आरोग्यासाठी मौखिक आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे. नागरिकांमध्ये दात किडणे व हिरड्यांचे आजार जास्त प्रमाणात आढळून येतात. या दोन व्याधींबरोबरच उपचारापासून किंवा दंतसेवेपासून व ज्ञानापासून वंचित अवस्थेत नागरिकांमध्ये मुख कर्करोग, कर्करोग पूर्व लक्षणे, सर्व दात पडणे, माल ऑक्ल्यूजन (दात वेडेवाकडे ) इत्यादी आजार आढळून येतात. फक्त त्रासच होत असल्याने व मृत्यू होत नसल्याने या व्याधींकडे दुर्लक्ष केले जाते. या आजरांबाबत अपुऱ्या जागरुकतेमुळे यांची व्यापकता व गांभीर्य वाढते.
मौखिक आरोग्य हे शरीराच्या आरोग्याशी संबंधित आहे. मौखिक आजार टाळण्यासाठी मौखिक स्वच्छतेची सुरूवात बाळाच्या जन्मापासून रोज रात्री दुध पाजल्यानंतर किंवा बाळाला खावू घातल्यानंतर त्याचे दात स्वच्छ करावे. आहारात हिरव्या पालेभाज्या व दुग्धजन्य पदार्थांचा अधिक उपयोग करावा. मौखिक आरोग्याची नियमित काळजी घेण्यासाठी दोनदा ब्रश करावा व हिरड्यांची निगा ठेवावी. श्वासात दुर्गंधी हिरड्या सुजल्या असतील, त्यातून रक्त येत असेल, दात किडले असतील तर तात्काळ दंतशल्य चिकित्सकांचा सल्ला घ्यावा.
जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालय व संशोधन केंद्र नागपूर येथील चमू मार्फत महिन्याच्या प्रत्येक चौथ्या बुधवारी कर्करोग निदान व उपचारासंबंधी मार्गदर्शन केले जाते. या मोहिमेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मुख तपासणी व कर्करोग निदान तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा. नागरिकांनी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळावे तसेच मौखिक आरोग्याची तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय येथे करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारुकी यांनी केले आहे.