जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्रीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा
– खासदार धानोरकर
Ø विविध योजनांची अंमलबजावणी व कामासंदर्भात अधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे
चंद्रपूर दि. 31 जुलै: जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्राच्या विविध योजना राबविल्या जातात. त्याची प्रभावी अंमलबजावणी करत लाभार्थ्यांना केंद्रीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा. तसेच प्रलंबित सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश खासदार बाळू धानोरकर यांनी यंत्रणांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. केंद्र शासनाची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दिनदयाल अंत्योदय योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना यासह विविध 29 योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी सदर आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, सर्वश्री आमदार प्रतिभा धानोरकर, सुभाष धोटे, किशोर जोरगेवार जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मनपा आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक कपिल कलोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, वीज वितरण विभागाच्या अधीक्षक अभियंता संध्या चिंवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी खासदार बाळू धानोरकर म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात फक्त 121 घरकुलाचे काम पूर्ण झाले आहे. ही फारच गंभीर बाब आहे. यासाठी पात्र लाभार्थ्यांना घरकुल अनुदान देऊन घरे बांधण्यास सहकार्य करावे तसेच आवास योजनेचा लाभ सर्वसामान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष घालावे. केंद्र शासनाची ही महत्त्वाची शासकीय योजना आहे, त्याची जनजागृती मोठ्या प्रमाणात केल्यास लाभार्थ्यांना सदर योजनेची माहिती मिळेल. यासाठी प्रयत्न करावे, असे सुचित करून अमृत योजनेचे उर्वरित दहा टक्के काम दोन महिन्यांमध्ये तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी मनपा आयुक्तांना दिले.
घरकुलाच्या बाबतीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत अनेकांना घरकुलाच्या शेवटच्या टप्प्यातील पैसे मिळाले नाही यामध्ये लाभार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे यासाठी काहीतरी मार्ग काढावा, अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्षा यांनी संबंधित यंत्रणेच्या विभाग प्रमुखाला दिल्या.
अतिवृष्टीमुळे किंवा इतर पिकांच्या रोगराईमुळे बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळवून द्यावा व अतिवृष्टीत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी मदत करावी, असे आमदार धोटे यांनी सुचविले.
प्रधानमंत्री पिक विमा योजने संदर्भात जिल्ह्यातील 1775 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसानीचा अहवाल जेव्हा सादर केला जातो त्याच्या 60 ते 90 दिवसांच्या कालखंडात शेतकऱ्यांना मदत देण्याचे करावे, अशा सूचना खासदार धानोरकर यांनी कृषी विभागाला दिल्या.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत राज्याला 6500 किमीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माहितीच्या आधारे चंद्रपूर जिल्ह्याला 176 किमी चे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी ज्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे त्या कामाची नावे सादर करावी, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद क्षेत्रात नरेगाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र वरोरा,भद्रावती तालुक्यात कामे अद्यापही सुरू झाली नाही यासाठी संबंधित अधिकाऱ्याने विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सदर बैठकीत दिल्या.
चिमूर व जिवती तालुक्यात इंटरनेट उपलब्ध राहत नाही. आज-काल सर्व कामे ऑनलाईन झाल्यामुळे अनेक कामे पूर्ण होत नाही व शासकीय कर्मचाऱ्यांना व तेथील नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागतो. यासाठी टेलिकॉम विभागाला यापूर्वीच सूचना देण्यात आल्या होत्या ते कार्य कुठपर्यंत पूर्णत्वास आले याबाबत खासदार बाळू धानोरकर यांनी माहिती जाणून घेतली व सदर काम पूर्णत्वास नेण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या.
या बैठकीमध्ये विविध विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली व लोकप्रतिनिधी मार्फत ज्या सूचना सदर बैठकीत देण्यात आल्या त्या पूर्णत्वास न्यावे, असे निर्देश खासदार धानोरकर यांनी दिल्या.