अतिवृष्टीत नुकसान झालेल्यांना सर्वतोपरी मदत करणार– मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
चंद्रपूर,दि. 29 जुलै : जिल्ह्यात 23 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिवती, राजुरा व कोरपना तसेच लगतच्या काही तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या पूर परिस्थितीत शेती, घरे व जनावरांच्या गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदर नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आराखडे तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच अतिवृष्टीत नुकसान झालेल्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित जिल्ह्यातील पूरग्रस्तांबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेश सुरवाडे, राजुराचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, जिवतीचे तहसीलदार अमित बनसोडे, तहसीलदार (सामान्य) यशवंत धाईत, महसुल सहाय्यक प्रमोद गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.वडेट्टीवार पुढे म्हणाले की, अतिवृष्टीमुळे शेती, घरे व इतर बाबींचे नुकसान झालेल्यांना तत्परतेने मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तसेच भविष्यातील अतिवृष्टीच्या दृष्टीने किंवा पूर परिस्थिती हाताळण्याच्या संदर्भात नदी-नाले यांचे कायमस्वरूपी नियोजन करावे. जेणेकरून पूर परिस्थितिचा फटका बसणार नाही.
पालकमंत्री पुढे म्हणाले, सोयाबीन व कापूस ही नाजूक पिके असल्याने शेतात पाणी साचल्यामुळे पिके खराब होतात. नाले उथळ झाल्यामुळे नाल्याचे पाणी शेतात जाऊन शेतीचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतीलगत असलेल्या तसेच नुकसान होणाऱ्या भागातील नाल्यांची माहिती घ्यावी व नाला खोलीकरणाचे प्रस्ताव सादर करावे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकूण 1775 शेतकऱ्यांनी कापूस पिकाचा विमा काढला आहे. पण अतिवृष्टीमुळे 80 टक्के कापूस पिकाचेच नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी पालकमंत्री श्री. वडेट्टीवार यांना दिली. तसेच ज्या ठिकाणची पिके वाहून गेली त्या ठिकाणी दुसरी पिके घेण्यासाठी बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे अशा सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कृषी विभागाला दिल्या.
*वेकोली म्हसाळा तुकुम येथील शेतजमीन भूसंपादित प्रकल्पग्रस्तांचा आढावा*
वेकोली म्हसाळा तुकुम येथील शेतजमीन भूसंपादित प्रकल्पग्रस्तांचा आढावा घेताना पालकमंत्री म्हणाले की, कृषी अधिकारी, तहसीलदार व वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा. तसेच परिसरातील नुकसानग्रस्त शेतजमिनीची पाहणी करावी. पाहणीअंती वेकोलिमुळे नुकसान होत असेल तर त्याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी वेकोलिच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी वेकोली भटाळा गावच्या पुनर्वसनाबाबत आढावा घेतला व बेस लाइन सर्वे करण्यास गावकऱ्यांनी वेकोलि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.