मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळल्या प्रकरणी
हल्दीरामला अन्न व औषध प्रशासनाची नोटीस
चंद्रपूर दि.23 जुलै : शहरातील मे. प्लॅनेट फूड ओम इंडस्ट्रीज इंडिया प्रा. लि.( हल्दीराम) या पेढीची अन्न व औषध प्रशासन विभागाने तपासणी केली असता तेथील स्वीट चीली सॉस, पाणीपुरी, बारीक आग्रा सेव, बेसन इत्यादी अन्नपदार्थ मुदतबाह्य असल्याचे आढळून आले. तसेच तपासणीदरम्यान पेढीमध्ये माशांचा वावर आढळून आला. तसेच कामगारांची वैद्यकीय तपासणी केल्याचे आढळून आले नाही, स्निग्ध पदार्थ व इतर पदार्थ कोणत्या माध्यमात तयार केली जातात, याचे निर्देश फलक नाही, स्टोअर रूममध्ये खाद्य व अखाद्य पदार्थ एकत्र साठवलेले आढळले. तसेच सदर पेढीने (हल्दीराम) विनापरवाना पेढीकडून अन्नपदार्थाची खरेदी केल्याचे आढळले नाही.
अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006, नियम व नियमन 2011 च्या विविध तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी मे.प्लॅनेट फूड (हल्दीराम) या पेढीला अन्न व औषध प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीसच्या उत्तराच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनामार्फत पुढील कारवाई करण्यात येईल.
अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006, नियम व नियमन 2011 अंतर्गत नियमांचे पालन करूनच अन्न व्यवसाय करावा. तसेच ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या अन्नपदार्थांची तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासन, प्रशासकीय भवन, दुसरा माळा, खोली क्र. 21 व 22, चंद्रपूर येथे संपर्क साधावा, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे, सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते यांनी कळविले आहे.