कन्हारगांव अभयारण्यात रोजंदारी वनकामगारांना पुर्ववत कामावर ठेवणार – आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या आभासी बैठकीत झाला निर्णय
चंद्रपुर जिल्हयात अनेक वन्यप्राणी असल्याने ताडोबा सारखी अभयारण्ये निर्माण झाली आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन कन्हारगांव हे अभयारण्य म्हणुन १५ मार्च २०२१ मध्ये घोषीत झाले व तेव्हापासुन त्याची देखभाल वनविकास महामंडळातर्फे करण्यात येत आहे. या अभयारण्यात अनेक वनकामगार रोजंदारीवर काम करत होते. त्यापैकी जवळपास ३८ वनकामगारांना १ मे २०२१ पासुन कामावरून कमी केले. ज्यामुळे त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.
याकरिता माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेवून त्या वनकामगारांची व्यथा मांडली. त्यावर आ. मुनगंटीवार यांनी त्वरीत मा. जिल्हाधिकारी व वनाधिकारी श्री. अनारसे व त्यांची चमु यांची संयुक्त बैठक घेवून त्यावर तोडगा काढण्यास सांगीतले. परंतु या गोष्टींचे अधिकार हे वरिष्ठ अधिका-यांना असल्याचे वनाधिका-यांनी सांगीतले. याच अनुषंगाने आ. मुनगंटीवार यांनी सर्व संबंधित वरिष्ठ अधिका-यांची झुम बैठक आज दिनांक २०.०७.२०२१ रोजी घेतली. या बैठकीला वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. वासुदेवन, प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजिव म.रा. श्री. लिमये, प्रादेशिक व्यवस्थापक, चंद्रपूर प्रदेश श्री. अनारसे, माजी आमदार सुदर्शन निमकर, भाजपा जिल्हाध्यक्ष ग्रामीण देवराव भोंगळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
आ. मुनगंटीवार यांनी त्या वनकामगारांना पुढील ४ महिन्यापर्यंत कामावर ठेवून त्यांना मानधन दयावे, त्या काळात त्यांच्या रोजगाराचा किंवा स्वयं रोजगाराचा प्रश्न प्रामुख्याने हाताळावा असे निर्देश दिले जे वरिष्ठ वनाधिका-यांनी मान्य केले. १० ऑगस्ट नंतर वरील सर्व अधिका-यांनी कन्हारगांवला भेट देवून तेथील स्थानिक नागरिकांच्या रोजगाराचा व स्वयं रोजगाराचा प्रश्न समजुन घेवून तिथेच त्यांना काम कसे मिळेल या करिता प्रयत्न करावा. स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलेही प्रश्न सुटणार नाहीत यावर आ. मुनगंटीवार यांनी भर दिला.