संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी जिल्ह्यात ऑक्सीजन प्लाँटचे काम पूर्ण करा – पालकमंत्री वडेट्टीवार
Ø वेळेवर ऑक्सीजनची कमतरता पडू देऊ नका
चंद्रपूर, दि. 19 जुलै : सद्यस्थितीत कोरोनाबाधितांची संख्या व मृत्युचा आकडा कमी झाला असला तरी संभाव्य तिस-या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पहिल्या दोन लाटेमध्ये ऑक्सीजनसाठी नागरिकांची गैरसोय झाली होती. ही परिस्थिती भविष्यात येऊ नये तसेच ऑक्सीजनची कमतरता पडू नये म्हणून संभाव्य तिस-या लाटेपूर्वी जिल्ह्यात सर्व ऑक्सीजन प्लाँटचे काम तातडीने पूर्ण करा, असे आदेश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोव्हीड संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, मनपा आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण आधिकारी डॉ. संदीप गेडाम आदी उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ऑक्सीजन प्लाँटचे बांधकाम त्वरीत पूर्ण करा, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, बांधकामाच्या स्थितीबाबत जिल्हा शल्य चिकित्सक तसेच अधिष्ठाता यांनी नियमित पाठपुरावा करावा. ऑक्सीजन प्लाँटकरीता निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे कामात विलंब व्हायला नको. संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभुमीवर सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये रुग्ण वाढण्याची शक्यता राहू शकते. त्यामुळे ऑगस्ट अखेरपर्यंत सर्व पीएसए ऑक्सीजन प्लाँट कार्यान्वित होणे आवश्यक आहे.
ऑक्सीजन रिफिलिंगकरीता पुरवठादारांशी आतापासून नियमित संपर्क ठेवा. वेळेवर ऑक्सीजनची कमतरता भासू देऊ नका. तसेच खाजगी रुग्णालयाच्या व्यवस्थेवर अवलंबून न राहता शासकीय स्तरावर सर्व नियोजन करा. खाजगी रुग्णालयात अव्वाच्या सव्वा बील आकारणीमुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. तसेच रुग्ण गंभीरावस्थेत गेल्यावर त्याला शासकीय यंत्रणेकडे पाठविले जाते. ही बाब लक्षात ठेवून पीएसए ऑक्सीजन प्लाँटबाबत सुक्ष्म नियोजन करा. यावेळी त्यांनी लसीकरणाचा आढावासुध्दा घेतला.
कोव्हीडच्या सद्यस्थितीबाबत माहिती देतांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सांगितले की, जिल्ह्यात रोज दोन ते अडीच हजार टेस्टिंग होत असून पॉझेटिव्हीटी दर एक पेक्षा खाली आहे. तसेच गत 10 दिवसांपासून जिल्ह्यात एकही मृत्यु झाला नाही. ही अतिशय दिलासादायक बाब आहे. दुस-या लाटेमध्ये जिल्ह्यात 17600 रुग्ण ॲक्टीव्ह होते. शासनाच्या सुचनेनुसार यात 25 टक्के वाढ गृहीत धरून जवळपास 22000 ॲक्टीव्ह रुग्ण जिल्ह्यात राहू शकतात. त्यानुसार प्रशासनाने नियोजन केले आहे. सर्व तालुका स्तरावर डीसीएचसी करण्यात येणार असून ऑक्सीजनची पाईपलाईनसुध्दा झाली आहे. तिस-या लाटेत लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांकडून लष्करे कुटुंबाचे सांत्वन : दुर्गापूर येथे जनरेटरच्या वायुमुळे लष्करे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. यात कुटुंबातील सहा जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. 13 जुलै रोजी घटना घडली त्यावेळेस पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ माहिती जाणून घेतली होती. त्यानंतर आज (दि.19) पालकमंत्री जिल्हा दौ-यावर आले असता त्यांनी लष्करे कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले व धीर दिला. |