दुर्गापूर येथील दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी व मृतकांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री निधीतुन अर्थसहाय्य प्रदान करावे – आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
दुर्गापूर येथे दिनांक १२ जुलै रोजी जनरेटर मधील गॅस गळतीमुळे कंत्राटदार रमेश लष्करे यांच्यासह कुटूंबातील सहा जणांचा दुर्देवी मुत्यु झाल्याच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी त्याच प्रमाणे या घटनेत ज्यांचा बळी गेला त्या मृतकांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री निधीतुन अर्थसहाय्य प्रदान करावे अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. दुर्गापूर येथील रहिवासी श्री. रमेश लष्करे यांनी रात्री ११.०० वाजताच्या सुमारास घरातील जनरेटर सुरू करून सर्व झोपलेले असताना जनरेटरचा धूर बाहेर पास न झाल्याने गुदमरून कुटूंबातील रमेश लष्करे, अजय लष्करे, लखन लष्करे, कृष्णा लष्करे, पुजा लष्करे , माधुरी लष्करे या सहा जणांचा मृत्यु झाला. सौ. दासू लष्करे यांची प्रकृती चिंताजनक असून डॉ. झाडे यांच्या खाजगी हॉस्पीटलमध्ये त्या उपचाराकरिता भरती आहेत. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच तातडीने मृतकांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री निधीतुन अर्थसहाय्य मिळणे गरजेचे असल्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.