भंडारा : राष्ट्रीय लोक अदालत 1 ऑगस्ट रोजी

राष्ट्रीय लोक अदालत 1 ऑगस्ट रोजी

भंडारा, दि.13:- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये जिल्हा न्यायालय भंडारा, कौटुंबिक न्यायालय भंडारा, औद्यागिक न्यायालय, कामगार न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये 1 ऑगस्ट 2021 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

न्यायालयात दाखल करण्यापुर्वीचे प्रकरणे तसेच न्यायालयात दाखल असलेली तडजोडपात्र फौजदारी स्वरूपाची प्रकरणे, परकाम्य विलेख अधिनियमाच्या (एन.आय. ॲक्ट) कलम 138 खालील, बँक वसूलिची प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, भूसंपादणाची प्रकरणे, दिवाणी प्रकरणे तसेच सर्वच प्रकारची तडजोडपात्र दाखल व दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यासाठी न्यायाधीश, तज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्ते यांचे पॅनल मदत करणार आहे. ज्या पक्षकारांना आपली अशाप्रकारची प्रकरणे या लोकअदालतीमध्ये तडजोडीकरिता ठेवायची आहेत, त्यांनी त्यांची प्रकरणे लोक अदालतीमध्ये निकाली काढून या संबंधित न्यायालयात ताबडतोड अर्ज सादर करुन या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश भंडारा अंजू एस. शेंडे तसेच प्रभारी सचिव जिल्हा विधी सेवा प्रधिकरण भंडारा सुहास प्र. भोसले यांनी केले आहे.