खरीप हंगामात जिल्हयात 324 शेतकरी शेतीशाळेचे आयोजन

खरीप हंगामात जिल्हयात 324 शेतकरी शेतीशाळेचे आयोजन

Ø आतापर्यंत 9720 शेतकऱ्यांनी नोंदविला सहभाग

चंद्रपूर दि. 9 जुलै: शेतकऱ्यापर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहचविणे व सुधारीत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी शेतकरी शेतीशाळा हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. मागील वर्षीप्रमाणे या वर्षीसुध्दा क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या सहभागाने सोयाबीन, कापूस, भात, तूर व हरभरा पिकाकरीता शेतकऱ्यांची शेतीशाळा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने खरीप हंगाम 2021-22 मध्ये चंद्रपूर जिल्हयात अनुदानीत 170 तर  विनाअनुदानित 154 असे एकूण 324 शेतकरी शेतीशाळा राबविण्यात आल्या. यामध्ये 259 पुरुष

  शेतीशाळा तर 65 महिला शेतकऱ्यांच्या शेतीशाळांचे आयोजन करण्यात आले. या  शेतीशाळेमध्ये  जिल्हयातील 9720 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.

शेती शाळेमध्ये सोयाबीन, कापूस, भात, तुर व हरभरा या पिकांचे पेरणीपूर्व ते काढणी पश्चात तंत्रज्ञानाबाबत वर्गनिहाय मार्गदर्शन केले जाते. सदर वर्गाची सुरूवात ही 15 मे पासून करण्यात आली आहे. शेतीशाळा वर्ग हे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या शेतावर राबविली जाते, त्यामुळे पिकांवरील विविध किडी, रोग, त्यावरील मित्रकिटक व त्यांचे शेतीतील महत्व शेतक-यांना पटवून देता येते. शेतकऱ्यांना शेतीशाळेमध्ये प्रशिक्षण साहित्य उपलब्ध करून देण्यात येते. प्रशिक्षण साहित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विषय समजून घेण्यास मदत होते.

 सदर शेतीशाळेमध्ये प्रगतीशील शेतकरी व कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ यांना आंमत्रीत करून त्यांनी अवलंब केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतीशाळेमार्फत शेतकऱ्यांना पोहचविणे शक्य होत आहे. तसेच शेतीशाळा हे प्रभावीपणे राबविले जावे, यासाठी शेतीशाळेच्या पालकत्वाची जबाबदारी ही जिल्हयातील सर्व अधिकाऱ्यांवर सोपविण्यात येत आहे.

शेतीशाळेमध्ये राबविले जात असलेले विविध उपक्रम : गट पीक प्रात्यक्षिक, आंतरपीक प्रात्यक्षिक, महिला शेतीशाळा, एक गाव एक वाण, जमिनीची आरोग्यपत्रीका, पीक स्पर्धा, बिजोत्पादन, पीक संग्रहालय, रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन, बी.बी.एफ. लागवड तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन, तालुक्यातील दोन प्रमुख पिकांमध्ये उच्चतम उत्पादन घेणारे 2 शेतकरी व त्यांनी विकसीत केलेल्या तंत्रज्ञानाची माहिती शेतीशाळेमध्ये देण्यात येत आहे.

शेतीशाळा हे शेतकऱ्यांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रभावी माध्यम असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेतीशाळेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.