वन्यजीव सप्ताहानिमित्त बाईक रॅली व वृक्षारोपण कार्यक्रम
वन परिक्षेत्र,सिंदेवाही व स्वाब नेचर केअर फाऊंडेशन, सावरगांव चेआयोजन.
सिंदेवाही ते चिटकी 15 किलोमीटर बाईक रॅली व चिटकी येथे विविध फळझाडांचे रोपण.
संपूर्ण देशामध्ये ०१ ऑक्टोबर ते ०७ऑक्टोबर हा सप्ताह ‘वन्यजीव सप्ताह’ म्हणून वन विभाग व स्थानिक एन्.जी.ओ. मार्फत पर्यावरण पूरक विविध उपक्रम राबवून साजरा केला जातो. या सप्ताहाचे औचित्य साधून, वनपरिक्षेत्र कार्यालय, सिंदेवाही तथा स्वाब नेचर केअर फाउंडेशन, सावरगांव ता. नागभिड यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.
यावेळी स्वाब नेचर केअर फाऊंडेशनचे संपूर्ण सदस्य व सिंदेवाही वन परिक्षेत्रातील संपूर्ण वन कर्मचारी यांनी वन परिक्षेत्र कार्यालय, सिंदेवाही पासून सिंदेवाही शहर – किन्ही – सरडपार – चिटकी पर्यंत १५ कि.मी. अंतर, बाईक रॅली काढली. या रॅलीमध्ये ”वृक्ष लावा, वृक्ष जगवा”, “वन्य प्राण्यांचे संरक्षण करा!”,
“पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा!”
“पेड़ एक, फायदे अनेक”, अशा पद्धतीचे पर्यावरण मार्गदर्शक नारे लावत ही रॅली पूर्ण केली. त्यानंतर चिटकी येथे मागील वर्षी ०३ऑक्टोबरला विद्युत प्रवाहाने मृत झालेल्या हत्तीच्या स्मरणार्थ त्या परीसरात आंबा, चिंच, सीताफळ, आवळा, करवंद, बेहडा, बदाम, हिरडा इत्यादी प्रकारच्या वेगवेगळ्या फळझाडांची लागवड करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा केला. त्यानंतर स्वाब संस्थेद्वारे हत्तीच्या स्मरणार्थ मागील वर्षी लावण्यात आलेल्या दोन्ही वडाच्या झाडांभोवती मानवी शृंखला बनवून आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपस्थित गावकऱ्यांना वन्यजीव व वृक्षारोपण याचे महत्त्व व संवर्धन या विषयावर स्वाब नेचर केअर फाऊंडेशनचे संस्थापक- सल्लागार हरिभाऊ पाथोडे यांनी मार्गदर्शन केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नेतृत्व वन परिक्षेत्र, सिंदेवाहीचे अधिकारी विशाल सालकर व स्वाब नेचर केअर फाऊंडेशनचे अध्यक्ष, यश कायरकर यांनी केले.
यावेळी सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील संपूर्ण वन कर्मचारी, स्वाब संस्थेचे संपूर्ण कार्यकर्ते, डब्लू.पी.एस.आय. चे रोशन धोतरे उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे आभार संस्थेचे सचिव अनिल लोनबले यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिवेश सयाम, हितेश मुंगमोडे. छत्रपती रामटेके, नितीन भेंडाळे इत्यादी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.