चंद्रपूर महानगरपालिकेस दीड कोटींचे बक्षीस अमृत शहर यादीत विभागस्तरावर प्रथम क्रमांक माझी वसुंधरा ४.० अभियान

चंद्रपूर महानगरपालिकेस दीड कोटींचे बक्षीस
अमृत शहर यादीत विभागस्तरावर प्रथम क्रमांक
माझी वसुंधरा ४.० अभियान

चंद्रपूर २९ सप्टेंबर – पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियान ४.० हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक १ एप्रिल, २०२३ ते दिनांक ३१ मे, २०२४ या कालावधीत राबविण्यात आले होते. मोठ्या संख्येने स्थानिक संस्थांच्या सहभागात चंद्रपूर महानगरपालिकेने विभाग स्तरावर प्रथम क्रमांक तर राज्यात १२ वा क्रमांक प्राप्त केला असुन या कामगिरीसाठी मनपास दीड कोटींचे बक्षीस प्राप्त झाले आहे.        माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये राज्यातील ४१४ नागरी स्थानिक संस्था व २२,२१८ ग्राम पंचायती अशा एकूण २२,६३२ स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता.यात अमृत शहरे गटांसाठी डेस्कटॉप मुल्यमापन व फिल्ड मुल्यमापन करतांना ११,६०० गुण ठेवण्यात आले होते. या दोन्ही मूल्यमापनातील गुणांच्या आधारे चंद्रपूर महानगरपालिकेने १ ते ३ लक्ष लोकसंख्येच्या व अमृत शहरांच्या यादीत विभाग स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. मिळालेल्या बक्षीस रकमेचा वापर करण्याविषयी महापालिकांना सरकारने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्याचा वापर निसर्गाच्या पंचतत्त्वांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठीच्या उपाय- योजना हाती घेण्यात येणार आहेत.
शहराचे हरित आच्छादन वाढविणे, अमृत वन, स्मृती वने, शहरी वने, सार्वजनिक उद्याने, जुन्या हरित क्षेत्रांचे संवर्धन आणि देखभाल, जलसंवर्धनाचे उपक्रम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, नदी, तळे व नाले यांचे पुनरु- ज्जीवन, सौरऊर्जेवरील एलईडी दिवे, विद्युत वाहन चार्जिंग पॉइंट उपलब्ध करून देण्यासाठी निधी वापरला जाणार आहे. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धाच्या विजेत्यांना बक्षीस देण्यात येणार आहे.