‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’:
अर्ज नोंदणीसाठी पैसे घेतल्याच्या वृत्ताची चौकशी
गडचिरोली : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’चा अर्ज भरण्यासाठी सेतू चालकाकडून पैसे घेतल्याच्या वृत्तची तात्काळ दखल घेवून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी गट विकास अधिकारी सुरेंद्र गोंगले यांना चौकशीचे आदेश दिले होते. श्री गोंगले यांनी पोटेगाव ग्रामपंचायत येथे सभा घेवून ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेबाबत ग्रामस्थांना माहिती दिली. तसेच सेतू केंद्राची चौकशीही केली. संबंधित सेतू केंद्र चालक व गावातील नागरिकांचे बयान घेतल्यानंतर अर्ज नोंदणीचे पैसे घेण्यात आलेले नसून सहायक कागदपत्राच्या प्रिंट आऊटचे नियमानुसार पैसे घेण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. या योजनेअंतर्गत सेतु सुविधा केंद्रातून ऑनलाइन नोंदणी होत नसल्याने ऑनलाइन साठी पैसे घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचा अहवाल त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे सोपविला आहे.
दरम्यान या योजनेअंतर्गत अर्ज नोंदणीसाठी कोणी पैशाची मागणी करत असल्यास त्याबाबत नजीकच्या गटविकास अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय अथवा महिला व बालविकास कार्यालयात तसेच जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या तक्रार निवारण व सहायता कक्षाच्या भ्रमणध्वनी क्रमांक ८९९९३६८९१५ व ८६९८३६१८३० यावर संपर्क करावा, असे आवाहन श्रीमंती आयुषी सिंह यांनी केले आहे.