नवउद्योजकांना गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या संधी
यशस्वीतेसाठी सकारात्मक मानसिकतेची गरज
– जिल्हाधिकारी संजय दैने
• इग्नाईट महाराष्ट्र कार्यशाळेत तरूणांना उद्योजकतेचे धडे
गडचिरोली,दि.10 : गडचिरोली जिल्ह्याला लाभलेली सुपीक जमीन, पाण्याची मुबलकता, विविध खनिज व वन संपत्तीची उपलब्धता या सर्वांसोबतच राज्य व केंद्र शासनाकडून प्रत्येक उद्योगासाठी मिळणारी मदत यामुळे जिल्ह्यात उद्योग-व्यवसाय सुरू करून वाढविण्यासाठी पोषक वातावरण आहे. या सर्वांचा लाभ घेवून उद्योग क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक मानसिकता व प्रामाणिक प्रयत्नाची गरज असल्याचे मत जिल्हाधिकारी संजय दैने यांनी आज व्यक्त केले.
जिल्हा उद्योग केंद्रातर्फे नियोजन भवन येथे आयोजित इग्नाईट महाराष्ट्र या कार्यशाळेत जिल्हाधिकारी दैने मार्गदर्शन करत होते. यावेळी उद्योग अधिकारी श्री शिवनकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश गायकवाड, विदेश व्यापार महासंचालनालयाच्या सहायक संचालक स्नेहल ढोके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोडी, पर्यटन विभागाचे उपसंचालक प्रशांत सवई आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री दैने पुढे महणाले की उद्योग क्षेत्रात पुढे येवू इच्छिणाऱ्या युवकांनी गडचिरोली हा मागास असल्याची भावना मनातून काढून टाकावी. हा जिल्हा नैसर्गिक संपत्तीने श्रीमंत आहे. येथील आदिवासी शिक्षीत आहे. येथे मध, मोहफुल, चारोळी, तेंदूपत्ती, बांबू, सागवान, औषधी वनस्पती आदि वनउपज तसेच लोह, ग्रेनाईट व इतर खनिज, काजू, स्ट्रॉबेरी पिकविणारी सुपीक जमीन, बारमाही नद्यांमुळे विविध प्रक्रिया उद्योग व्यवसायात अमर्याद संधींची उपलब्धता आहे. उद्योग व्यवसायासाठी पुढे येणाऱ्यांच्या पाठीशी शासन मदत करायला नेहमीच तयार असल्याचे श्री दैने यांनी सांगितले.
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जिल्ह्यात उद्योग विकासासाठी तसेच शासकीय योजना व धोरण उद्योजकांपर्यत पोहचवून उद्योजक व शासन यांच्यात दुवा साधण्यासाठी आजच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेत विविध क्षेत्रातील तज्ञांनी नवउद्योजकांना मार्गदर्शन केले. यात विदेश व्यापार महासंचालनालयाच्या सहायक संचालक स्नेहल ढोक यांनी आयात-निर्यात व्यवसाय, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोडी यांनी कृषी उद्योगातील संधी, मैत्री संस्थेचे सागर ऑटी यांनी व्यवसाय सुविधा केंद्र, पर्यटन विभागाचे उपसंचालक प्रशांत सवई यांनी गडचिरोली पर्यटन क्षेत्रातील संधी, लॉईड मेटल्सचे संचालक विक्रम मेहता यांनी मोठ्या उद्योगामुळे जवळच्या परिसरात निर्माण होणाऱ्या व्यवसायाच्या संधी, आयडीबीआय बँकेचे विवेक निर्वानेश्वर यांनी लघु व मध्यम उद्योगाकरिता अर्थसहाय्य, धीरज कुमार यांनी डिजिटल कॉमर्स, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे अनिल जाधव आणि सुरेखा अहिरे यांनी उद्योग विमा, डाक विभागाचे विपणन अधिकारी पंकज कांबळी यांनी पोस्टाद्वारे मालवाहतूक या विषयावर माहिती दिली.
कार्यशाळेत जिल्ह्यातील उद्योजक तसेच नवउद्योजक सहभागी झाले होते.