नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून करा अर्ज
– अर्ज भरण्याची प्रक्रिया निशुल्क
भंडारा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून सामान्य महिला देखील अर्ज भरू शकते. ॲप मध्ये अर्ज भरताना अडचण आल्यास नजीकच्या अंगणवाडी केंद्रात देखील अर्ज भरून द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.
तसेच भरलेला अर्ज अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांकडून प्रविष्ट केला जाईल आणि दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती दिली जाईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य राहील.
सुधारित शासन निर्णयानुसार या योजनेत आता 21 ते 65 वयोगटातील मुली व महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ मिळणार आहे. पहिल्या टप्प्याची नोंदणी 31 ऑगस्ट पर्यंत होणार आहे. त्यामुळे मुली महिलांनी नोंदणीसाठी गर्दी न करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
तसेच हे अर्ज भरण्यासाठी किंवा या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या असामाजिक तत्त्वांना बळी पडू नये, असेही श्री. कुंभेजकर म्हणाले.
मात्र महिलेस आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात रक्कम दिली जाईल. 21 ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा घटस्फोटीत, परितक्ता आणि निराधार महिला कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला लाभासाठी पात्र असेल.
दरम्यान या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आज महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी देखील vc द्वारे मार्गदर्शन केले.