आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत जिवतीमध्ये संपूर्णत: अभियानाचा शुभारंभ Ø तालुक्याच्या सर्वांगीन विकासासाठी ही सुवर्णसंधी – जिल्हाधिकारी गौडा Ø जिवती एक आदर्श तालुका करण्यावर भर – सीईओ जॉन्सन

आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत जिवतीमध्ये

संपूर्णत: अभियानाचा शुभारंभ

Ø तालुक्याच्या सर्वांगीन विकासासाठी ही सुवर्णसंधी – जिल्हाधिकारी गौडा

Ø जिवती एक आदर्श तालुका करण्यावर भर – सीईओ जॉन्सन

चंद्रपूर, दि. 4 : केंद्र शासनाच्या नीति आयोगाने संपूर्ण भारतात 500 आकांक्षित तालुके घोषित केले आहे. यात महाराष्ट्रातील 27 तालुक्यांचा समावेश असून चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती हा एकमेव तालुका आकांक्षित म्हणून घोषित झाला आहे. या अंतर्गत तीन महिन्याच्या कालावधीत केंद्र शासनाच्या 40 निर्देशांकापैकी जिवती तालुक्यात 6 निर्देशांक 100 टक्के साध्य करणे, हे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत आजपासून (दि.4) जिवती तालुक्यात संपूर्णत: अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाला जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे (सामान्य), मिना साळूंके (पंचायत), संग्राम शिंदे (महिला व बालविकास), राजुराचे उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, जि.प. समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिवतीचे तहसीलदार अविनाश शेंबटवाड, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे, नीति आयोगाचे समन्वयक विनय हनवते आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, नीति आयोगाचे हे महत्वाकांक्षी अभियान असून आकांक्षित जिल्ह्यानंतर आता आकांक्षित तालुके हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार तालुका स्तरावर संपूर्णत: अभियानाच्या माध्यमातून तालुक्याचे मागासलेपण दूर करून सर्वांगीन विकासाची ही एक सुवर्ण संधी आहे. या अंतर्गत सहा निर्देशांक 100 टक्के पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. याबाबत केंद्र स्तरावरून नियमितपणे व्हीसी द्वारे विचारणा होत असते. जिवती तालुका हे सहा उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तयार आहे. सर्व विभागांनी यात योग्य समन्वय राखून काम करावे. तसेच जास्तीत जास्त लोकसहभाग वाढवावा. सर्वांनी मिळून काम केले तर जिवती तालुका विकासाच्या बाबतीत अग्रक्रमावर राहील, असा विश्वास जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी व्यक्त केला. तसेच गत एक – दीड वर्षांपासून जिवतीमध्ये अतिशय चांगले काम झाले आहे. तालुक्याच्या सर्व टीमचे यावेळी त्यांनी अभिनंदन सुद्धा केले.

जिवती एक आदर्श तालुका करण्यावर भर – सीईओ जॉन्सन

जिवती तालुक्याचे सहा निर्देशांक 100 टक्के पूर्ण करायचे असल्यामुळे त्याचे योग्य नियोजन करा. जिल्हा प्रशासनाचे प्रथम प्राधान्य जिवती तालुक्याला असते. दर्जेदार शिक्षण, आरोग्याच्या उत्तम सुविधा, कुपोषणावर नियंत्रण व पायाभूत विकास याबाबतीत संपूर्णत: अभियानाच्या माध्यमातून जिवती एक आदर्श तालुका करण्यावर आपला भर आहे, असे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, जि.प. शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत चांगले उपक्रम राबविण्यात येत आहे. आरोग्याच्या चांगल्या सुविधा तालुक्यात देण्याचा प्रयत्न आहे. याच अनुषंगाने शेंडगाव येथे ‘स्मार्ट पीएचसी’ उभारण्यात येणार आहे. अंगणवाडीसाठी ‘मिशन अंकूर’ सुरू करण्यात आले आहे. तालुक्यातील कुपोषण कमी करण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी विशेष प्रयत्न करावेत, अशा सुचनाही विवेक जॉन्सन यांनी केल्या.

हे आहेत जिवती तालुक्यासाठी विशेष निर्देशांक : आरोग्य व पोषण, शिक्षण, कृषी व संलग्न सेवा, सामाजिक विकास आणि मुलभूत पायाभूत सुविधा या प्रमुख पाच थीमवर सदर अभियान 4 जुलै ते 30 सप्टेंबर 2024 या  कालावधीत राबविण्यात येणार आहे. यात 1) गरोदर मातांची पहिल्या तिमाहीमध्ये 100 टक्के नोंदणी करणे, 2) तालुक्यामध्ये 30 वर्षांपेक्षा जास्त वय असणा-या नागरिकांची 100 टक्के उच्च रक्तदाब तपासणी करणे, 3) या वयोगटातील नागरिकांची मधुमेह तपासणी करणे, 4) तालुक्यातील 100 टक्के गरोदर मातांना नियमितपणे पोषण आहार देणे, 5) भुधारकांना मृदा आरोग्य कार्डचे वितरण करणे आणि 6) तालुक्यातील 100 टक्के बचत गटांना खेळते भांडवल उपलब्ध करून देणे.

विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र वाटप : संपूर्णत: अभियानांतर्गत तालुका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यात चित्रकला स्पर्धेत आरोही लकडे (प्रथम), नरशिता तांबोळी (द्वितीय), शिवम कागणे (तृतीय). निबंध स्पर्धेत जोया शेख (प्रथम), आनंद कुरेवार (द्वितीय)  तर माध्यमिक गटात तिरुपती जाधव (प्रथम). तसेच मॅरेथॉन मुलांच्या स्पर्धेत विवेक चव्हाण (प्रथम), कृष्णा राठोड (द्वितीय), प्रसाद राठोड (तृतीय), मुलींच्या स्पर्धेत पायल चव्हाण (प्रथम), नयना जाधव (द्वितीय), साक्षी मारमवार (तृतीय).

यावेळी मान्यवरांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून मशाल प्रज्वलन करण्यात आले. तसेच परिसरात वृक्षारोपन, लोगो अनावरण, सामूहिक शपथ, विविध योजनांच्या स्टॉलचे उद्घाटन, घडीपुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे यांनी तर संचालन भिमाशंकर काळे यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी मुजीब शेख, जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक नुतन सावंत, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंगेश काळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. हिरुळकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.