भाडे तत्वावर दिलेल्या नझुल जमिनीबाबत अभय योजना मोहीम

भाडे तत्वावर दिलेल्या नझुल जमिनीबाबत अभय योजना मोहीम

चंद्रपूर, दि. 2 : नागपूर व अमरावती  विभागातील निवासी प्रयोजनार्थ भाडे तत्वावर दिलेल्या नझुल जमिनी संदर्भात विशेष अभय योजना 2024-25 बाबत शासन निर्णय निर्गमित  करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयातील 1.1 नुसार निवासी प्रयोजनार्थ भाडे तत्वावर दिलेल्या नझुल जमिनीबाबत विशेष  अभय योजनेच्या तरतुदी खालीलप्रमाणे विहीत करण्यात आल्या आहेत.

1) प्रस्तुत अभय योजना ज्या नझुल जमिनी निवासी प्रयोजनार्थ लिलावाद्वारे- प्रिमियम अथवा अन्य प्रकारे भाडे तत्वावर देण्यात आलेल्या आहेत, त्यांनाच लागू राहतील.  2) ही योजना 2024-25 मध्ये 1 एप्रिल 2024  ते 31 जुलै 2025 या कालावधीसाठीच लागू राहील. 3) नझुल जमिनीच्या निवासी प्रयोजनार्थ प्रिमियम/ लिलावाद्वारे अथव अन्यप्रकारे भाडे तत्वावर दिलेल्या आहेत, त्यांना फ्रि  होल्ड करणे (भोगवटदार -1) करण्याकरीता अशा जमिनीच्या प्रचलित वार्षिक  दर विवरणपत्रातील येणाऱ्या बाजारमूल्याच्या 2 टक्के एवढे अधिमूल्य आकारण्यात यावे.

फ्रि होल्ड करण्याकरिता अन्य अटी व शर्ती शासन निर्णय 2 मार्च 2019 प्रमाणे पुर्वीचा भाडेपट्टा नियमित करणे, शर्तभंग नियमानुकुल करणे  संदर्भात परि. क्र. 2, 3 व 4 मधील अटी कायम राहतील. अभय योजनेत थकित भाडेपटयाची रक्कम 0.02 टक्के  दराने आकारणी करण्यात यावी . तसेच शर्तभंग बाबत शेवटचा शर्तभंग केल्याच्या दिनांकाच्या वेळी  त्या वर्षीच्या वार्षिक दरसुचीप्रमाणे जमिनीच्या बाजारमुल्याच्या 1 टक्के दराने अनर्जित रक्कम आकारण्यात यावी.

निवासी  प्रयोजनार्थ प्रिमियम लिलावाद्वारे व अन्यथा भाडेपट्ट्याने दिलेल्या नझूल जमिनीचे वार्षिक  भु-भाडे आकारणी 0.02 टक्के दराने व कालमर्यादेत (दि.31 जुलै 2025 पूर्वी) भरणे अनिवार्य असेल. 31 जुलै 2025 पर्यंत प्रलबिंत  भु-भाडे न भरल्यास थकीत भू-भाडे  व त्यावर वार्षिक 10 टक्के दंडनीय व्याज आकारणी करण्यात येईल.

प्रस्तुत नझुल जमिनीकरीता निवासी प्रयोजनार्थ भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनीकरिता विशेष अभय योजना समाप्तीनंतर दिनांक 1 ऑगस्ट 2025 पासून शासन निर्णय 23 डिसेंबर 2015 व शासन निर्णय दिनांक 2 मार्च 2019 च्या तरतुदी लागू राहतील, असे उपजिल्हाधिकारी डी.एस. कुंभार यांनी कळविले आहे.