गडचिरोली पोलीस दलातर्फे नवीन कायद्यांच्या अनुषंगाने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

गडचिरोली पोलीस दलातर्फे नवीन कायद्यांच्या अनुषंगाने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

• श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी केले उपस्थितांना मार्गदर्शन

विद्यमान कायद्यांच्या दीर्घकालीन अकार्यक्षमता आणि अपूरेपणाच्या निराकरणासाठी तसेच देशाच्या कायदेशिर चौकटीचे आधुनिकीकरण आणि सुव्यवस्थितीकरण करण्याच्या उद्देशाने भारतीय दंड सहिता १८६०, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ व भारतीय पुरावा कायदा १८७२ या तीन कायद्यांमध्ये फेरबदल करुन अनुक्रमे भारतीय न्यायसंहिता-२०२३, भारतीय नागरी सुरक्षा संहिता-२०२३ व भारतीय साक्ष अधिनियम-२०२३ हे तीन महत्वाचे कायदे अस्तित्वात आले. सदर कायद्यांची अंमलबजावणी आज दिनांक ०१ जुलै २०२४ पासून संपूर्ण भारत देशात होत असल्याने आज दिनांक ०१ जुलै २०२४ रोजी गडचिरोली पोलीस दलातर्फे नवीन कायद्यांच्या अनुषंगाने झालेल्या बदलांबाबत विविध शासकिय विभागातील अधिकारी व कर्मचारी, आशा वर्कर्स, पोलीस पाटील, सामान्य नागरिक व महिला यांचेकरिता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य हॉल येथे करण्यात आले.

सदर आयोजित मार्गदर्शन शिबिरात श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी नवीन कायद्यांच्या अंमलबजावणीवर तसेच कायद्यांबाबत झालेल्या सकारात्मक बदलांबद्दल प्रकाश टाकतांना सांगितले की, भारतीय न्याय संहिता ही सद्य सामाजिक मूल्ये आणि तांत्रिक प्रगती प्रतिबिंबीत करण्यासाठी कायदेशिर तरतुदी सुलभ आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने मूळ फौजदारी कायद्यांवर लक्ष केंद्रित करते. तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता ही प्रक्रियात्मक पैलूंवर फेरबदल करुन जलद आणि अधिक कार्यक्षम न्याय वितरण सुनिश्चित करते. यासोबतच भारतीय साक्ष अधिनियम ही डिजिटल आणि इलेक्ट्रानिक रेकॉर्ड समाविष्ट करण्यासाठी पुराव्याच्या नियमांचे आधुनिकीकरण करते, जे आजच्या डिजिटल युगात अधिकाधिक संबंधित आहे.

यासोबतच नवीन कायद्यांमध्ये महिला व बालकांबाबत करण्यात आलेला सकारात्मक बदलांचे ज्ञान महिला व बालकांपर्यंत पोहचविता यावे याकरिता आशावर्कर्स, अतिदुर्गम व ग्रामीण भागातील लोकांपर्यंत नवीन कायद्यांच्या अनुषंगाने झालेले बदल याबाबत माहिती पोहचविता यावी याकरिता दुर्गम भागातील पोलीस पाटील, सामान्य नागरिक व महिला तसेच विविध शासकिय विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना या मार्गदर्शन शिबिरामध्ये बोलविण्यात आले होते.

सदर मार्गदर्शन शिबिरामध्ये श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली, श्री. कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) तसेच सुमारे ३५० ते ४०० च्या संख्येने विविध शासकिय अधिकारी व कर्मचारी, आशा वर्कर्स, पोलीस पाटील, सामान्य नागरिक व महिला उपस्थित होते.

या मार्गदर्शन शिबिराच्या यशस्वीतेसाठी पोनि. उल्हास भुसारी, स्थागुशा गडचिरोली, पोनि. अरुण फेगडे पोस्टे गडचिरोली व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.