चामोर्शी येथील खून प्रकरणातील आरोपींना जन्मठेपेची  शिक्षा ठोठावण्यात आली

चामोर्शी येथील खून प्रकरणातील आरोपींना जन्मठेपेची  शिक्षा ठोठावण्यात आली

• मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गडचिरोली श्री. विकास एस. कुलकर्णी यांचा न्यायनिर्णय

सविस्तर वृत्त असे आहे की, यातील फिर्यादी नामे देवराव कानु कुमरे, वय ५० वर्षे रा. पावीमुरांडा यांचा भाऊ दिलीप कुमरे हा त्याची पत्नी नामे बारुबाई व मुलगा समिर याचेसोबत राहत होते. दिनांक २०/०८/२०२२ रोजी आरोपी समीर दिलीप कुमरे हा बांधकाम मजुरीच्या कामासाठी घोटजवळील मौजा मंजेगांव येथे गेला होता. दिनांक २१/०८/२०२२ रोजी फिर्यादीचा भाऊ दिलीप याची तब्बेत बरी नसल्याने तो उपचारासाठी गडचिरोली येथे जावून उपचार घेवून घरी परत आला तेव्हा तो दारु पिलेला होता. तो घरी आल्यानंतर काही वेळाने त्याने त्याची पत्नी आरोपी बारुबाई हिचेसोबत भांडण करुन तिला लाथा-बुक्यांनी मारहाण केली त्यामुळे त्याची पत्नी बारुबाई हिने तिचा मुलगा समिर याला फोनवरुन तुझ्या वडीलाने मला मारहाण केली अशी माहिती दिल्याने समिर हा दिनांक २२/०८/२०२२ रोजी सकाळी ०७:०० वा. घोटवरुन एसीटी बसने घरी आला. त्यानंतर फिर्यादी बँकेचे कामानिमित्त मौजा तळोधी येथे निघुन गेला. बँकेचे काम आटोपून फिर्यादी गावी दुपारी ०४:०० वा. घरी परत आले, तेव्हा फिर्यादीचे भाऊ दिलीप यांचे घराशेजारी राहणारे ईसम नामे किसन पत्रु ऊईके, संपत जयराम पेंदाम व जिवन उष्टु पेंदोर यांनी फिर्यादीला सांगितले की, तुझा पुतण्या समिर व भाऊसुन बारुबाई यांनी तुझा भाऊ दिलीप कानु कुमरे, वय ४५ वर्षे याचेशी दुपारी ०१:०० वा. दरम्यान भांडण करुन त्याला लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. अशी माहिती मिळाल्याने फिर्यादीच्या रिपोर्टवरुन पोलीस स्टेशन चामोर्शी येथे अप. क्र. २५९/२०२२, कलम ३०२, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे तपासात आरोपी समिर दिलीप कुमारे, वय २१ वर्षे यास गुन्ह्यात वापरण्यात आलेले बांबुचे लाकडी दांड्याबाबत विचारपूस केली असता, आरोपीने दोन पंचासमक्ष ज्या बांबुच्या लाकडी दांड्याने मृतकाला हातापायावर व डोक्यावर मारुन ठार केले तो बांबुचा लाकडी दांडा घटनेचे दिवशी चुलीमध्ये टाकुन जाळुन टाकला व त्याची तयार झालेली राख बैलाचे गोठ्यात फेकुन दिली. त्यामुळे गुन्ह्यात कलम २०१ वाढ करण्यात आली. तसेच न्यावैद्यकिय प्रयोग शाळेचा अहवाल व इतर पुरावे सरकारी पक्षाने मा. न्यायालयात सादर केले त्यावरुन सेशन क्रमांक १०३/२०२२ नुसार खटला न्यायालयात दर्ज करण्यात आला. विद्यमान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश गडचिरोली श्री. विकास एस. कुलकर्णी यांनी सर्व बाबींचा व सरकारी पक्षाने सादर केलेला पुरावा योग्य व न्यायोचित ग्राह्य धरुन काल दिनांक २५/०६/२०२४ रोजी आरोपी क्र. १) समिर दिलीप कुमरे वय २१ वर्षे व आरोपी क्र. २) बारुबाई ऊर्फ अनिता दिलीप कुमरे वय ४० वर्षे दोघेही रा. पावीमुरांडा तह. चामोर्शी जि. गडचिरोली यांना कलम ३०२ भादंवि अन्वये दोषी ग्राह्य धरुन जन्मठेप व प्रत्येकी २०००/- रु द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली. तसेच २०००/- द्रव्यदंड न भरल्यास ०३ वर्षे वाढीव शिक्षा तसेच आरोपींना कलम २०१ भादंवि मध्ये दोषी ग्राह्य धरुन ०३ वर्षाची शिक्षा व प्रत्येकी १०००/- रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली.

सरकार तर्फे जिल्हा सरकारी वकील श्री. एस. यु. कुंभारे यांनी कामकाज पाहिले, तसेच गुन्ह्याचा तपास पोनि. बिपीन शेवाळे पोस्टे चामोर्शी यांनी केला. तसेच संबंधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.