1 ली ते 8 वी तील विद्यार्थ्यांना मिळणार एक जोडी बुट व पायमोजे Ø 1 लाखाच्या वर विद्यार्थ्यांसाठी पाऊणे दोन कोटी रुपये वर्ग

1 ली ते 8 वी तील विद्यार्थ्यांना मिळणार एक जोडी बुट व पायमोजे

Ø 1 लाखाच्या वर विद्यार्थ्यांसाठी पाऊणे दोन कोटी रुपये वर्ग

चंद्रपूर, दि. 19 : मोफत गणवेश योजनेप्रमाणेच शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता 1 ली 8 वी मधील सर्व विद्यार्थ्यांना सन 2023-24 पासून दरवर्षी एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे चा लाभ शाळा व्यवस्थापन समितीकडून देण्यात येत आहे. याकरीता प्रति विद्यार्थी 170 रुपये इतकी रक्कम निश्चित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील 1610 शाळांमधील 1 लक्ष 2 हजार 425 विद्यार्थ्यांकरीता प्रति विद्यार्थी 170 रुपये याप्रमाणे एकूण 1 कोटी 74 लक्ष 12 हजार 250 रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून सर्व विद्यार्थ्यांना एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजेचा लाभ देण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. यांनी कळविले आहे.

केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 8 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या मुलांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. तसेच सन 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या मुलांनासुद्धा देण्याबाबतचा निर्णय 6 जुलै 2023 च्या शासन निर्णयाद्वारे घेण्यात आला. केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत गणवेश योजनेकरीता निर्धारीत केलेल्या प्रती गणवेश 300 रुपये याप्रमाणे राज्य शासनानेसुध्दा दोन गणवेशाकरीता प्रति विद्यार्थी 600 रुपये रक्कम निश्चित केली आहे.