आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त काऊंटडाउन-7 दिवस शेष कार्यक्रमाचे भव्य उद्घाटन संपन्न

आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त काऊंटडाउन-7 दिवस शेष कार्यक्रमाचे भव्य उद्घाटन संपन्न

              नागपूर, आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून रोजी संपूर्ण विश्वात साजरा करण्यात येणार आहे याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उ‌द्देशाने भारत सरकार केंद्रीय सूचना एवं प्रसारण मंत्रालय अंतर्गत केंद्रीय संचार ब्यूरो क्षेत्रीय कार्यालय नागपूर, योग विद्या धाम नाशिक अंतर्गत कार्यरत योग विद्या धाम भंडारा शाखा व असर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 14 जून रोजी जागतिक योगदिवसाच्या निमित्याने प्रोटोकॉल वर्गाचे प्रचारार्थ काउंट डाऊन समारोहाचा भव्य उ‌द्घाटन सोहळा भंडारा येथे स्प्रिंग डेल शाळेच्या पटांगणात उत्साहात संपन्न झाला.

         समारोहाला सकाळी ठीक सहा वाजता सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस महिला आघाडी प्रमुख सौ.जयश्रीताई बोरकर, सेंट्रल कम्युनिकेशन ब्युरो नागपूर विभागाचे श्री. सौरभ खेकडे, श्री. नारायण चोले, ज्येष्ठ योग शिक्षक श्री.श्याम कुकडे, श्री.रमेशजी खोब्रागडे, श्री. दीपक तिघरे, प्रजापिता ब्रह्मा कुमारी अध्यात्म केंद्राच्या शालू दीदी, श्री. प्रेमराज मोहकर, योग विद्या धाम भंडाराचे अध्यक्ष श्री विलासजी फाटे, कार्यकारी सचिव डॉ.नरेंद्र व्यवहारे, श्री देवहरे सर व्यासपीठावर उपस्थित होते.

          संस्कार भारतीच्या सुंदर रांगोळ्यांनी सजवलेल्या ओंकार आणि भारत मातेच्या फोटो समोर सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून ऑकार व भारत माता पूजन करण्यात आले तसेच योग दिनासाठी नियोजित प्रार्थना अर्थासहित म्हटल्या गेली.

         सर्व पाहुण्यांचा विविध रोपं आणि प्लास्टिक मुक्त कापडी पिशवी देऊन सत्कार करण्यात आला आणि वृक्ष लागवडीचा व प्लास्टिकचा वापर टाळण्याचा संदेश देण्यात आला. योग विद्या धाम भंडाराच्या साधकांनी डॉ. विनोद पथ्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली सुश्राव्य योग गीत सादर केले. तसेच आसनांचे सुंदर प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

           असर फाउंडेशनच्या कलाकारांनी भारतातील योग परंपरा, त्याचे महत्व, आजच्या ताण तणावाच्या परिस्थितीत सर्वांनी योगाभ्यास करण्याची गरज असे विविध पैलू आपल्या नाटीकेतून अतिशय प्रभावीपणे जनतेला प्रोत्साहन देण्यासाठी सादर केले आणि उपस्थित जनतेला योग अंगीकार करण्याचा संदेश दिला.

सौ जयश्रीताई बोरकर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा देत योग विद्या धाम शाखेच्या कार्याचे कौतुक केले.

केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय नागपूर तर्फे श्री सौरभ खेकडे यांनी या प्रोटोकॉल वर्ग के सात दिन शेष प्रमोशन कार्यक्रमाचा उ‌द्देश सर्वांना विशद करून सांगितला आणि सर्वांना योगाकडे वळण्यासाठी आग्रह धरीत शुभेच्छा दिल्या. यानंतर योगशिक्षिका सौ जयश्रीताई फटे तसेच सहशिक्षिका कु वैदेही करेमोरे व श्री. प्रवीण तिडके यांनी सर्व उपस्थित 250 साधकांकडून पूरक हालचाली, योगासने व प्राणायामाचा अभ्यास करवून घेतला.

          कार्यक्रमाच्या समापन प्रसंगी योगशिक्षक श्री देव्हारे सर यांनी उपस्थित सर्वाचे आभार मानले. डॉ नरेंद्र व्यवहारे यांनी विश्व कल्याण प्रार्थना गायन करत या भव्य कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाचे सुंदर संचालन योगशिक्षिका डॉ. सौ अश्विनी व्यवहारे यांनी केले.

         कार्यक्रम स्थळी सुंदर रांगोळ्यांचे रेखाटन सौ चंदाताई मुरकुटे हिने केले होते. उपस्थित सर्व साधकांना व पाहुण्यांना थंड शरबत चे वाटप करून निरोप देण्यात आला.

           प्रोटोकॉल योग शिबिर आणि या कार्यक्रमासाठी सर्व योग वि‌द्या धामच्या योग साधकांनी, असर फाऊंडेशन चे श्री विक्रम फडके, श्री वैभव कोलते तसेच कार्यक्रमाच्या सफल आयोजना साठी केंद्रीय संचार ब्युरो चे श्री संजय तिवारी, तकनीकी सहायक, नरेश गच्छकायला आणि चंदु चडुके यांनी अविरत परिश्रम घेतले.